डोंबिवली : डोंबिवलीमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीमध्ये गाडी पार्कींगवरुन झालेल्या वादामुळे काही तरुण आपसात भिडले आणि या वादामध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीती गोळवली परिसरात घडली आहे. बबलू गुप्ता असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आधी दोन गट आपसात भिडल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. उपचारा दरम्यान बबलू गुप्ता याचा मृत्यू झाल्याने पोलीस पोस्टमार्टेम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत.
डोंबिवली पूर्वेतील गोळवली परिसरात बबलू बद्रीनाथ गुप्ता या व्यक्तीचे पेपरचे गोदाम आहे. १३ ऑगस्टच्या रात्री मोहम्मद जहागीर नावाचा चालक पेपरने भरलेली पिक अप गाडी घेऊन गोदामासमोर आला. गोदामासमोर तीन ते चार दुचाकी उभ्या होत्या. त्यावर काही तरुण बसले होते. चालकाने त्या तरुणांना सांगितले की, दुचाकी बाजूला करा मला त्याठिकाणी पिकअप गाडी उभी करायची आहे. चालक गाडी मागे पुढे करीत असताना तरुणांचा आणि चालकाचा वाद झाला. या वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले. गोदामामध्ये असलेले कामगार आणि बबलू गुप्ता हे गोदामा बाहेर आले. तोपर्यंत तरुणाच्या गटाने जवळपास २० पेक्षा जास्त तरुणाना बोलावून घेतले होते. पुन्हा तरुणांच्या टोळक्याने गोदामातील कामगार आणि बबलूला मारहाण केली. गोदामातील लोक गोदाम सोडून पळून गेले. बबलू मात्र त्याच ठिकाणी होता.
हेदेखील वाचा – भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑलिम्पिक खेळाडूंचे काही खास क्षण
दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्यावर पाहिले तर बबलू गोदामासमोर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्याला रुग्णलायात दाखल केले. उपचारा दरम्यान बबलू याचा मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांनी हाणामारी प्रकरणी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. बबलूचा मृत्यू मारहाणीमुळे झाला आहे का? यासाठी पोलीस पोस्टमार्टेम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहे. बबलू याच्या वर गॅस सिलेंडरचा बाटला टाकला होता. तो आजारी देखील होता. आत्ता मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. गाडी पार्किंगच्या वादातून तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण परसरले आहे.