राजकारण्यांनी टीव्ही मालिका देखील सोडल्या नाहीत; शिंदे गटाविरोधात काँग्रेसची तक्रार
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची पोस्टर्स दाखवून छुप्या पद्धतीने प्रचार करण्याची क्लुप्ती अवलंबलेली आहे. हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून, निवडणूक आयागाने याची गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सांवत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावर सदर घटना गंभीर असून निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय झाल्याने तात्काळ कारवाई करु, असे आश्वासन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सावंत यांना दिले आहे, असे सावंत म्हणाले. यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन सचिन सावंत यांनी रितसर तक्रार दाखल केली आहे.
सावंत पुढे म्हणाले की, स्टार प्रवाह वाहिनी वरील मालिकांच्या कंटेटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची जाहिरात करणारी पोस्टर्सचे चित्रिकरण दाखवण्यात आलेले आहे. एक दृष्यातून दुसऱ्या दुष्ट्यात जाताना मध्येच अशी पास्टर्स दाखवण्यात आलेली आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या भागात तसेच १४ तारखेला दुपारी १२ वाजता आणि ४ वाजता पुनःप्रक्षेपण भागातही ही पोस्टर्स दाखवण्यात आलेली आहेत. याच वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ व इतर मालिकांमध्येही अशाच छुप्या पद्धतीने जाहिरातबाजी केलेली आहे परंतु डिस्ने हॉस्टस्टार या त्यांच्याच ओटीटी प्लॅटफार्मवरील मालिकांमध्ये मात्र शिंदेसेनेची पोस्टर्स दाखवलेली नाहीत. आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून कदाचित ही लपावछपवी केली असावी.
या पोस्टरबाजीसाठी शिंदे सेनेकडून स्टार प्रवाह वाहिनीला अधिकृत रक्कम दिली आहे का, आणि नसेल तर हा काळ्या पैशाचा व्यवहार आहे, आर्थिक गुन्हे शाखेनेही याची दखल घेऊन चौकशी करावी. इतर वाहिन्यांबद्दलही अशाच तक्रारी येत असून अत्यंत वाईट व कुटील पद्धतीने प्रचार केला जात आहे त्यावर कारवाई करावी असे सावंत म्हणाले. यावेळी मुंबई काँग्रेसचे सोशल मिडिया विभागाचे अध्यक्ष नंदेश पिंगळे व पदाधिकारी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा : ओमराजे निंबाळकरांची PM माेदी यांच्यावर टीका; म्हणाले, घोटाळा करणाऱ्यांना…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. सर्व राजकीय पक्षातील नेते जोरदार प्रचार करत आहेत. त्यामुळे राज्यात कोणाची सत्ता येणार हे चित्र 23 तारखेनंतर स्पष्ट होणार आहे.