
पुण्यात काँग्रेस स्वबळावर की आघाडीमध्ये लढणार? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
पक्षाकडून आत्तापर्यंत २११ अर्ज गेले असून, १३ डिसेंबरपर्यंत अर्ज जमा करता येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. शिंदे म्हणाले, “आम्ही प्रभागनिहाय बैठका घेतल्या असून, त्यालै चांगला प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या ७ बैठका झाल्या आहेत, त्यामध्ये वाटाघाटी करणे, उमेदवारी निश्चिती, वेगवेगळ्या समित्या स्थापन करून त्यानुसार निवडणुकीच्या कामाला वेग दिला आहे. जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल. स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने आमच्याकडे प्रत्येक प्रभागासाठी उमेदवार आहेत, असं यावेळी शिंदे यांनी सांगितले.
निवडणुकीसाठी वेगवेगळी समीकरणे तयार होत आहेत, मात्र प्रदेश समिती आघाडीबाबत घेईल, त्या निर्णयाचे आम्ही पालन करू. काँग्रेसमध्ये सामुहिक नेतृत्व असून, प्रत्येक ज्येष्ठ नेत्याकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.’ मतदार यादीतील दुबार नावे, मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात जाणे किंवा आपल्या प्रभागात येणे अशा अनेक प्रकारांद्वारे मतदार याद्यांचा गैरवापर सुरू असल्याचं अविनाश बागवे यांनी सांगितले.
महापालिकेच्या माध्यमातून भाजप निधी उभारतो
महापालिकेकडून प्रभाग रचनेपासून ते मतदार याद्यांबाबत प्रचंड गोंधळ सुरू आहे. भाजप महापालिकेच्या माध्यमातून निवडणुकीसाठी निधी उभारत आहे. मोठे व धोरणात्मक निर्णय नवीन सभागृह घेईल, मात्र भाजपला निवडणुकीसाठी निधी मिळावा, यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्या, वृक्ष गणनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केला जात आहे. महापालिका हा निधी भाजपला निवडणुकीसाठी देत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.