
मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला, मोदींनी जनतेची माफी मागावी, नाहीतर...; काँग्रेसचा इशारा
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांचा तीव्र निषेध केला व ते पुढे म्हणाले की, अहिल्यादेवींचा ३०० वा जन्मशताब्दी उत्सव साजरा करण्यासाठी भाजपा सरकार एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत आहे तर दुसरीकडे मात्र अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचे पाप करत आहे. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपाचा हा दुटप्पीपणा जनतेनेसमोर उघड झाला आहे. नरेंद्र मोदींच्या अंगात गजनीचे भूत शिरले आहे, असा गंभीर आरोप करून अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही. भाजपा व मोदींच्या या कृतीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिला आहे.
भाजपाच्या एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही
ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यावेळी म्हणाले की, अहिल्यादेवींनी १७७१ मध्ये वाराणसीत मणिकर्णिका घाट बांधला, या घाटावर १० जानेवारी रोजी भाजपा सरकार व नरेंद्र मोदी यांनी बुलडोझर चालवला. यावेळी अहिल्यादेवींच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, हे सर्व धनगर समाजाचा स्वाभिमान दुखवणारे आहे. २७ तारखेपर्यंत मोदींनी जाहीर माफी मागावी, अन्यथा भाजपाच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा देण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटावर बुलडोझर चालवून धनगर समाजाचा घोर अपमान केल्यानंतरही भाजपा आमदार गोपीचंद पडळकरसारखे धनगर समाजाचे नेते म्हणवणारे गप्प कसे बसले, असा सवाल यशपाल भिंगे यांनी विचारला आहे.
काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक
नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी केली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आघाडी केली जाईल. जेथे आघाडी करणे शक्य आहे तेथे आघाडी केली जाईल परंतु घड्याळाशी आघाडी केली जाणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.