
सातारा ड्रग्ज प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळांची टीका; बड्या नेत्यांवर गेले गंभीर आरोप
खरा आका हे देवेंद्र फडणवीसच – सपकाळ
सातारा जिल्ह्यातील ड्रग्जप्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, याआधी सातारा जिल्ह्यात ड्रग्जचा एक कारखाना सापडला होता, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या शेतात होता, याठिकाणी काम करणाऱ्या ४३ पैकी ४० बांग्लादेशी कामगारांना सोडून देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना क्लिन चिट देऊन टाकली. त्यावेळीच कठोर कारवाई केली असती तर आज पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा सापडला नसता. या ड्रग्जच्या काळ्या धंद्यातून आलेला पैसा मतदार व विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी खरेदी करण्यासाठी केला जात आहे. या सर्व प्रकरणाचा खरा आका हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्ष व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मोहम्मद अली जिना यांच्या पक्षाबरोबर जनसंघाने निवडणुका लढवल्या व त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केले, त्या सरकारमध्ये जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते, आज त्याचे पुनरुज्जीवन केले जात आहे, असेही सपकाळ म्हणाले.
संविधानिक पदाचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना पद्म पुरस्कार
भगतसिंह कोश्यारी हा विकृत माणून असून संविधानिक पदाचा त्यांनी अपमान केलेला आहे. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या तसेच शिव, शाहू, फुले यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. पुण्यातील एका सामाजिक संस्थेने मला पुरस्कार जाहीर केला होता, मात्र तो पुरस्कार कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात येणार होता, त्यामुळे मी त्या पुरस्काराला नकार दिला, असेही सपकाळ म्हणाले.
दावोस गुंतवणुकीची वस्तुस्थिती जाहीर करा
दावोसमधील गुंतवणुकीसंदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले की, राज्यात गुंतवणूक आली पाहिजे पण देवेंद्र फडणवीस हे, खोटं बोल पण रेटून बोल, पद्धतीने मोठे दावे करत आहेत. याआधी त्यांनी दावोसमधून १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचा दावा केला होता, त्याची वस्तुस्थिती काय, हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.