
देवेंद्र फडणवीस शॅडो मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा सर्व कारभार अमित शहा पाहतात; सपकाळांची टीका
देशतील काही निवृत्त अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पत्र लिहिल्याच्या मुद्द्यावर नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, गली गली में शोर है, निवडणूक आयोग चोर है, हे आता सर्वांना समजले आहे. हा विषय केवळ एका काँग्रेस पक्षाचा नाही तर सर्वांचाच आहे, नागरिकांचा आहे, मीडियाचा आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.
महाराष्ट्र गुजराकडे गहाण ठेवला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली, त्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा महायुतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री असून महाराष्ट्रातील सर्व निर्णय हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच घेतात त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरबुरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दोन दिवसापूर्वीच अमित शाह यांना भेटले होते त्यानंतर पार्थ पवार यांना पुण्यातील जमीन घोटाळ्यातून क्लिन चिट देण्यात आली. गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत टोळी युद्ध सुरु आहे आणि त्यातून नेहमी दिल्लीत जावे लागते, असेही सपकाळ म्हणाले.
आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर
मनसेसोबत आघाडी वा युती करण्यासाठी मुंबई वा महाराष्ट्रातून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढावी, अशी असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे, त्याचा आदर पक्षाने राखला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. इंडिया आघाडी बाहेरचा पक्ष आघाडीत येणार असेल तर तसा प्रस्ताव सादर करावा त्यावर राष्ट्रीय पातळीवर निर्णय होईल. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणे ठरवण्याचा अधिकार आहे, त्यांनी कोणाशी युती करावी हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असेही सपकाळ म्हणाले.
काँग्रेसला महाराष्ट्र धर्म शिकवू नये
मनसेच्या आरोपाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मराठी हा अस्मितेचा मुद्दा आहे, तो जोपासण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. मराठी हा केवळ भाषेपुरता विषय नसून, मराठी हा महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्र धर्म काँग्रेसला कोणी शिकवण्याची गरज नाही. पहिल्यापासून हिंदी सक्ती करण्याचा मुद्दा पुढे आला त्यावेळी सर्वात आधी काँग्रेसने विरोध केला होता, याचे स्मरण यानिमित्ताने करुन देत आहोत, असेही सपकाळ म्हणाले.
नगरपालिका निवडणूक प्रचार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज विदर्भातील अमरावती, अकोला जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. नागपूरहून ते अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाले. त्यानंतर अंजनगाव सुर्जी, अकोट, बाळापूर येथे काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या.