''महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणाऱ्या सरकारने...''; नाना पटोलेंचा शिंदे, फडणवीसांवर हल्लाबोल
मुंबई: राज्यामध्ये सध्या राजकोट प्रकरणावरुन वातावरण गरम आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र नौदलाकडून उभारण्यात आलेला हा पुतळा कोसळला. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी तीव्र रोष व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. मात्र विरोधकांनी या घटनेवर सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन नरेंद्र मोदींनी माफी मागितली याचाच अर्थ त्यांनी चूक मान्य केली आहे, पण महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता यांना माफ करणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
या संपूर्ण घटनेवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ”पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी घाईघाईने महाराजांचा पुतळा बसवला. वास्तविक पाहता महापुरुषांचा भव्य पुतळा उभारताना सर्व बाबींचा अभ्यास करावा लागतो परंतु भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. अनुभव नसलेल्या व्यक्तीकडे पुतळ्याचे काम दिले. पुतळ्यासंदर्भात सांस्कृतिक विभागाने दिलेल्या सुचनांकडे कानाडोळा केला व परिणामी नित्कृष्ट दर्जाचे काम केले म्हणून पुतळा कोसळला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची जबाबदारी घेऊन सत्तेतून पायउतार झाले पाहिजे अन्यथा जनता त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.”
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून विरोधकांनी राजकारण करु नये, या एकनाथ शिंदे व फडणवीसांच्या आव्हानाला उत्तर देत नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. केवळ मतांसाठी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला भाजपा कोणत्याही विषयाचे राजकारण करते. मविआचे सरकार खाली खेचण्यासाठी काय काय प्रकार केले हे देशाने पाहिले आहे. त्यामुळे दुसऱ्यांना सल्ला देण्याआधी त्यांनी स्वतःचा चेहरा आरशात पहावा असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.
मोदींच्या हस्ते त्यांचा ड्रीम प्रोजक्ट मानल्या जाणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाबद्दल भरसभेमध्ये माफी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे. मोदी म्हणाले की, सिंधूदुर्गामध्ये जे झालं ते वाईट झालं. माझ्यासाठी आणि माझ्या साथीदारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. सिंधूदुर्गातील प्रकरणामुळे मी आज नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची चरणावर डोके ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही अशी लोकं नाहीत जी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अर्वाच्च भाषेत बोलणारे आम्ही नाहीत. याच भूमीचे सुपुत्र असलेल्या वीर सावरकर यांचा काही जण अपमान करतात. मात्र तो केल्यानंतर माफी मागण्यसाठी सुद्धा तयार नाहीत. न्यायालयामध्ये जाऊन लढाई लढण्यासाठी तयार आहेत. एवढ्या महान देशभक्तांचा अपमान करुनही ज्यांना पश्चत्ताप होत नाही. त्यांचे संस्कार महाराष्ट्रातील लोकांना माहिती आहेत. मी आज या पुण्यभूमीमध्ये आल्यानंतर पहिलं काम आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची माफी मागण्याचं करतो आहे.