राहुल गांधींना धमकी दिल्यावरुन काँग्रेस आक्रमक; प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी दिला इशारा
मुंबई : काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमक्या देण्यात आल्या आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी यांची आजी इंदिरा गांधी व वडील राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. शहीद कुटुंबाचा वारसा असलेले राहुल गांधी अशा सोम्या- गोम्यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाहीत. राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना काँग्रेसचा कार्यकर्ताच चोख उत्तर देईल, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललेले नाहीत, अपशब्द वापरलेले नाहीत, इतिहासातील दाखले देऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे सावरकर यांच्याबद्ल जर समिक्षाच करायची असेल तर आतापर्यंत अनेक तज्ञ, इतिहासकार, विचारवंत यांनी सावरकर यांच्याबद्दल काय म्हटले आहे तेही पहावे. भारतीय जनता पक्षाचे नेते अरूण शौरी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमध्ये मंत्री होते, त्यांनी सावरकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात काय म्हटले आहे तेही पहावे व त्यावर बोलावे. एकट्या राहुल गांधींवर टीका करून त्यांना धमक्या देऊन काही साध्य होणार नाही, अशा धमक्यांना काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता भक्कमपणे उभा आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
राहुल गांधींना कोणी दिली धमकी?
नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, अशी थेट धमकी महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिली आहे. तसेच पुढे बोलताना म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही. त्यामुळे राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळे फासू…तसेच काळे फासता आले नाही तर राहुल गांधींवर दगडफेक करु, अशी धमकीच बाळा दराडे यांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या नेत्याने घेतलेल्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे बाळा दराडे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास आम्ही राहुल गांधी यांना धडा शिकवू…जरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी, महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, असंही बाळा दराडे म्हणाले.