प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
मुंबई : अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. मात्र गाडीतून उतरल्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला आहे. प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं असल्याचे सांगितले जात आहे. यावरुन आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंडाचा सुळसुळाट वाढला आहे. सरकारी पाठिंब्याने वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रविण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतिक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
प्रविण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करून हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातील गुंडगिरी थांबत नाहीय हे सत्य आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंड आणि माफियाचे असा प्रश्न पडावा इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संजय गायकवाड यांच्यासारखे सत्ताधारी पक्षाचे आमदारच कायदा हातात घेवून सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करतात. पण पोलीस त्यांच्यावर काही कारवाई करत नाहीत. गुंड आणि माफियांना सत्ताधारी पक्षाचे संरक्षण असून त्यांच्या मदतीने विरोधी विचारांच्या लोकांवर हल्ले करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विशेषत: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणिवपूर्वक लक्ष केले जात आहे. हे हल्लेखोर गुंड सरकारच्या अर्बन नक्षलींच्या व्याखेत बसत नाहीत का ? यांच्यावर जनसुरक्षा कायद्याखाली कारवाई होणार का? असा सवाल सपकाळ यांनी विचारला आहे.
पुढे बोलताना सपकाळ म्हणाले, हा हल्ला केवळ प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ला नाही, तर महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेवर, बहुजन स्वाभिमानावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. प्रविण गायकवाड हे गेल्या अनेक वर्षापासून राज्यभर फिरून व्याख्यान आणि भाषणांच्या माध्यमातून तरुणाईचे प्रबोधन करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, छत्रपती शाहू महाराजांनी, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. यामुळे काही संघटना व व्यक्तींच्या मनात त्यांच्या प्रति आकस आणि राग आहे. यातूनच हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. या हल्लेखोरांना बेड्या ठोकून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच या हल्ल्याचा मास्टरमाईंड शोधून त्यालाही गजाआड करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.