स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; 'या' तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. दिनांक ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता उद्घाटन होणार असून संविधानाला अभिप्रेत विकेंद्रित लोकशाही व महानगरपालिकांमधील राजकारण, या विषयावर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शनपर संबोधन करणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाने दिली आहे.
शहरी प्रश्न, सक्रियता आणि राजकारण, या विषयावर विवेक वेलणकर मार्गदर्शन करणार आहेत तर सत्र संचलन संग्राम खोपडे करणार आहेत. आजचे बदलते शहरी राजकारण आणि आपण, या विषयावर आशितोष शिर्के, राजू भिसे, संग्राम खोपडे हे सत्र संचालन करणार आहेत. घरपट्ट्यांची चळवळ या विषयावर संवाद व शहरांकरता भविष्यातील कार्यक्रम या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील आणि नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे स्वागत करणार आहेत तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी करणार आहेत.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील सांस्कृतिक राजकारण, शहरी नॅरेटीव व लोकसंवादातून लोकचळवळ या मुदद्यांचाही यावेळी उहापोह केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.
हर्षवर्धन सपकाळांचा RSS वर हल्लाबोल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्ष, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिन असा सुवर्ण योग आला हा नियतीचा संकेत आहे, तो संकेत मानून संविधान व गांधी विचार स्विकारा व संघाचे विसर्जन करा हे आवाहन आम्ही केले होते. पण दसऱ्याच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यावर एक शब्दही काढला नाही. संघाला १०० वर्षे झाली तरी मूंह में राम बगल में छुरी, ही संघाची भूमिका आजही बदललेली नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.