शिर्डी : “काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांसोबत संपर्क साधून जागा वाटपाच्या चर्चेची तारीख ठरवली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत उद्या (7 ऑगस्ट) जागावाटपाच्या चर्चा होईल ठरविली आहे. मी उद्या दिल्लीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. पण तिथे जागा वाटपाची चर्चा होणार नाही. जागावाटपाची चर्चा दिल्लीतर नाही तर मुंबईतच होईल,” अशी माहिती काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथ्थल्ला यांनी दिली. चेन्नीथ्थल्ला यांनी तीर्थक्षेत्र शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेतले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाबद्दल चर्चा सुरू असताना रमेश चेन्नीथला यांनी जागावाटपाबाबत भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना, “देशात सर्वाधिक भ्रष्ट सरकार महाराष्ट्रात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना चेन्नीथला म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे ते भ्रष्टाचाऱ्यांना पवित्र करते. केंद्र सरकारच्या या भ्रष्टाचारामुळे राज्यातील जनता नाराज आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना आपली नाराजी दाखवून दिली. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.
रमेश चेन्नीथला म्हणाले, आपल्याच मित्रपक्षांमध्ये फूट पाडून सत्तेत आलेले हे भ्रष्ट सरकार येत्या निवडणुकीत पायउतार होईल. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे महायुती सरकार जाहिरातींवर 264 कोटी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री निवडणूक झाल्यानंतर ठरवला जाईल. आमदार बाळासाहेब थोरात हे निष्ठावान व अनुभवी नेते आहेत. पण मुख्यमंत्रीपदी कोणाचे नाव निश्चित करायचे हे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेतेच घेतील, असेही रमेश चेन्नीथला यांनी यावेळी स्पष्ट केले.