Contractors forcefully install smart electricity meters in Mhaswad Satara News Update
म्हसवड : म्हसवड पालिका हद्दीतील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरी वीज वितरणाचे अधिकारी आणि ठेकेदार संगणमत करुन सक्तीचे स्मार्ट वीज मीटरची जोडणी करत असून याला विरोध करणाऱ्या वीज ग्राहकाला दमदाटी करीत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
स्मार्ट वीज मीटरबाबत शासनाने कोणताही अद्याप अधिकृत अद्यादेश काढला नसताना केवळ ठेकेदाराची मनमानी याठिकाणी सुरु असुन वीज ग्राहकांनी याबाबत विरोध करु नये, यासाठी ठेकेदाराने चक्क वीज वितरणच्या कर्मचार्यालाच यामध्ये सहभागी केले आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून वीज ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर बसवण्याबाबत सक्ती केली जात आहे, याला विरोध करणाऱ्या वीज ग्राहकाला संबधित वीज कर्मचारी दमदाटी करत असून, हा मीटर तुम्ही जर बसवला नाही तर यापुढे तुमचे मीटर रिडींग घेतले जाणार नाही, हे शासनाचे काम आहे. तुम्ही यात अडथळा आणू नका असे सांगत ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वास्तविक स्मार्ट वीज मीटरबाबत कोणालाही सक्ती करता येणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केले आहे. मात्र तरी देखील कोणाच्या सांगण्यावरुन ही सक्ती सुरु आहे असा संतप्त सवाल सर्वसामान्य वीज ग्राहकांनी विचारला आहे.
यापूर्वी म्हसवड शहरात संबंधित ठेकेदाराने असे मीटर ज्या विज ग्राहकांना बसवले आहेत त्यांना एका महिन्याचे वीज बील हे ५ हजार ते १५ हजार रुपये आल्याने कडाडून विरोध होत आहे. त्यातच शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आवाज उठवत संबंधितांविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यावर संबधित ठेकेदाराने स्मार्ट वीज मीटर बसवण्याबाबत कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले. पोलीस स्टेशन व संबधित आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर ही मोहिम थांबवण्यात आली. मात्र संबंधित ठेकेदाराने काही दिवस शांत बसत पुन्हा ही मोहिम सुरु केली, ही मोहिम सुरु करताना त्याने शहरांतर्गत येणाऱ्या वाड्या – वस्त्यांवरील घरांकडे वळवला ग्रामीण भागातील जनता ही सकाळीच आपल्या रानात कामासाठी जाते नेमकी हीच संधी साधून संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांच्या घरी कोणी नसताना सरसकट वीज मिटर बदलण्याचा झपाटा लावला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यानंतर त्यांना काही गावात येण्यास मज्जाव केल्याने संबंधित ठेकेदाराने शक्कल लढवत यासाठी थेट वीज वितरणाच्या कर्मचाऱ्याला हाताशी धरले. स्मार्ट वीज मीटर बसवताना हा कर्मचारी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांसोबत फिरत असून तो विरोध करणाऱ्यांना सक्ती करत आहे. सक्ती करु नये असे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले असले तर मग ही सक्ती संबधीतांकडून पंतप्रधानाच्या आदेशावरुन करत आहेत का ? असा सवाल सर्वसामान्यांकडुन विचारला जात आहे.
दरम्यान याबाबत वीज वितरणाशी संपर्क साधला केल्यावर आमचे सर्व कर्मचारी हे सध्या संपावर असून वीजमीटरबाबत आमच्याकडून कोणाला सुचना अथवा सक्ती केली जात नसल्याचे सांगण्यात आले असे असले तर मग संबंधित कर्मचारी त्या ठेकेदारासोबत कसा काय घरोघरी फिरतोय याचा खुलासा वीज वितरण कंपनी करणार का, अशी विचारणा सर्वसामान्य म्हसवडकर करत आहेत. आजवर जे स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आलेले आहेत त्यासाठी संबधितांना पूर्व सुचना अथवा त्यांची परवानगी संबधीतांनी घेतली नसल्याचे समोर आले असून यावर वीज कंपनी कारवाई करणार का असा सवाल वीज ग्राहकांतून विचारला जात आहे.