
स्मार्ट वीज मीटरला वीज ग्राहकांकडून जोरदार विरोध
त्याचे झाले असे की, गत वर्षापासून वीज कंपनीने वीज ग्राहकांचे पूर्वीचे वीज मीटर बदलून नवीन स्मार्ट वीज मीटर बसवण्यास सुरुवात केली. याबाबत वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे स्मार्ट वीज मीटर बसवले गेले. ही मीटर बदलाची सक्ती सुरू असतानाच, ज्यांचे वीज मीटर बदलून स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आले होते, त्यांना अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्याने शहरी भागापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत या स्मार्ट मीटरला विरोध वाढू लागला.
तरीही स्मार्ट वीज मीटरच्या कंत्राटदारांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वीज मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली होती. याबाबत काही ठिकाणी आंदोलने झाली, तर काही ठिकाणी मीटर बदलण्यासाठी आलेल्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांनी हाकलून लावल्याने, गत काही दिवसांपासून ही मीटर बदलण्याची प्रक्रिया काहीशी थंडावली होती.
स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे महागात; १९ वीजचोरांवर गुन्हे, नऊ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी
मात्र, काहीही करून ग्राहकांच्या माथी नवीन स्मार्ट वीज मीटर मारायचेच असल्यामुळे, आता वीज कंपनीने त्यावर एक नामी शक्कल लढवली आहे. यासाठी वीज कंपनीने ज्या वीज ग्राहकांचे मीटर जुने आहेत, त्यांना गत काही महिन्यांपासून वीज बिलात वाढ करून वीजबिले दिली आहेत. वीजबिलातील ही वाढ पूर्वीपेक्षा काही प्रमाणात जास्त असल्यामुळे वीज ग्राहकांनी याबाबत फारशी कुठे तक्रार केली नाही; मात्र आता या कंपनीने याच वीज ग्राहकांना चक्क दुप्पट वीजबिले पाठवल्याने, वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
जादा आलेल्या वीजबिला संदर्भात वीज ग्राहक जर वीज कंपनीच्या कार्यालयात गेला, तर त्याला “तुमचे वीज मीटर फॉल्टी असून ते बदलावाच लागेल,” असे सांगितले जात आहे. ‘मीटर न बदलल्यास पुढचे वीज बिल याहून अधिक येऊ शकते,’ अशी भीती दाखवली जात असल्याने ‘भिक नको पण कुत्रे आवर’ अशी वेळ वीज ग्राहकांवर आली आहे. वीज कंपनीने लढवलेल्या या नामी शक्कलीविरोधात वीज ग्राहक संरक्षण समिती आता कोणती उपाययोजना करणार की ग्राहकांना वाऱ्यावर सोडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. याद्वारे वीज कंपनी आणि संबंधित कंत्राटदारांची छुपी युती यानिमित्ताने उघड झाली आहे. यापूर्वी याच कंपनीचे अधिकारी, “आमचा या कंत्राटदारांशी काहीही संबंध नाही,” असे म्हणत होते. नंतर मात्र याच कंपनीचे अधिकारी व कर्मचारी या कंत्राटदारांसोबत वीज ग्राहकांच्या घरोघरी फिरू लागल्याने वीज कंपनीविरोधात ग्राहकांचा रोष वाढला होता. त्यावर पर्याय म्हणून आता ही नवी शक्कल लढवली जात असल्याचे बोलले जात आहे.
Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा
ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना सध्या अशी दुपटीने आलेली वीजबिले त्यांच्या मोबाईलवर दिसत असली, तरी प्रत्यक्षात ही वाढलेली वीजबिले जेव्हा ग्राहकांच्या हातात पडतील, तेव्हा मात्र वीज ग्राहकांना नक्कीच ‘४२०’ चा करंट बसल्याशिवाय राहणार नाही!
वीज कंपनीच्या स्मार्ट मीटरला राज्यातील कानाकोपऱ्यातून वीज ग्राहकांचा तीव्र विरोध झाल्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत सभागृहात यावर भाष्य केले होते. स्मार्ट मीटरसाठी ग्राहकांना सक्ती करता येणार नाही व हे मीटर फक्त उद्योगांसाठी (इंडस्ट्रीसाठी) बसवले जातील, अशी घोषणा त्यांनी केली होती; त्यामुळे सामान्य वीज ग्राहक खूश झाले होते. मात्र, त्यालाही वीज कंपनीने आता सुरुंग लावत जुन्या वीज मीटरधारकांच्या वीजबिलांमध्ये दुपटीने वाढ करून ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे.