नागपुरात संचारबंदी कायम; अनेक शाळांना सुट्टी जाहीर
नागपूर : नागुपरात औरंगजेबाची कबर हटवण्यावरून प्रचंड राडा झाल्याचे पाहिला मिळाले. या सर्व परिस्थितीवर पोलिस यंत्रणांनी कडक कारवाई करत वातावरण शांत केले. या झालेल्या जाळपोळीनंतर नागपुरात मंगळवारी तणावपूर्ण शांततेचे वातावरण दिसून आले. असे जरी असले तरी प्रशासनाकडून नागपुरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. इतकेच नाहीतर अनेक शाळांना सुट्टीही जाहीर केली गेली.
नागपूरमध्ये झालेल्या भीषण दंगलीत अनेक पोलिस आणि नागरिक गंभीर जखमी झाले. नागपूर झोन 5 चे उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत त्यांनी आता सविस्तर माहिती दिली आहे. नागपूरमध्ये अफवा पसरवणाऱ्या आणि हिंसाचार करणाऱ्या जिहादींवर कडक कारवाई करावी आणि औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी पूज्य धनाजी, संताजी, छत्रपती राजाराम महाराजजी यांचे स्मारक बांधावे, अशी मागणी आता केली जात आहे.
दरम्यान, दोन गटांत संघर्ष पेटल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला. एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. याचा परिणाम शहरातील जनजीवनावर झाला.
अनेक भागात संचारबंदी लागू
शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरातील अनेक शाळांना अचानक सुट्टी जाहीर करण्यात आली. संदीपानी आणि शाळा सेंटर पॉइंट स्कूल आणि अन्य शाळांचाही यामध्ये समावेश आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून शाळांना सुट्टीच्या सार्वजनिक सूचना अद्यापही आलेल्या नाहीत.
पोलिसांकडून दुकाने बंद करण्याचे आदेश
सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाल परिसरातील सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी बळजबरीने दुकाने बंद करण्यास सुरुवात केल्यामुळे नेहमी वर्दळीचा भाग असलेल्या महाल परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ झाली. पोलिसांनी मोठी कुमक मागवून बंदोबस्त तैनात केला. महाल परिसरात जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले.