
Dahegaon bungalow police post not constructed despite approval Jalna News
शेंदूरवादा : दहेगाव बंगला येथे पोलीस चौकीची घोषणा होऊन नऊ वर्षे उलटली तरी अजून प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गालगत असलेले दहेगाव बंगाल हे गंगापूर तालुक्यातील वेगाने वाढणारे आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. वाढती लोकसंख्या, व्यापारी हालचाल आणि वाहतूक अपघात या सगळ्या पार्श्वभूमीवर २०१६ साली येथे पोलिस चौकी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता नऊ वर्षे उलटून गेली तरी चौकीसाठी ना इमारत उभी राहिली, ना कर्मचारी नेमले गेले, ना मंजुरीची फाईल पुढे सरकली. नागरिकांचा प्रश्न आता थेट सुरक्षेचा झाला आहे. महामार्गावर रात्रीच्या वेळी वाढलेली वाहतूक, अपघात, चोरी, वादविवाद आणि संशयित हालचाली यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ठोस कार्यवाही होत नसल्याने संताप
दहेगाव बंगला येथे नागरिकांची सुरक्षा ही वाऱ्यावर सोडली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दहेगाव बंगाल गावीतून दररोज शेकडो वाहनं महामार्गावरून जातात. गावात व्यापारी व्यवहार, आठवडी बाजार, तसेच शाळा-कॉलेजमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु चौकी नसल्याने एखादी घटना घडल्यास पोलिसांना वाळूज पोलिस ठाण्याहून यावे लागते, जे जवळपास १२ ते १५ किलोमीटर अंतरावर आहे. या विलंबामुळे अनेकदा गुन्हेगार पसार होतात आणि पोलिस तपास उशिरा सुरू होतो.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तहसीलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांना दिले निवेदन
ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसीलदार, पोलिस अधिकारी आणि आमदार यांना निवेदन देऊन चौकी स्थापनेची मागणी केली आहे.
मात्र दरवेळी आश्वासनं मिळून ती कागदावरच राहिली. नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे आणि आता “जागा तयार आहे. मागणी जुनी आहे मग कारवाई कधी होणार?” असा प्रश्न थेट प्रशासनाला विचारला जात आहे.
ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
जर लवकरच चौकी स्थापन करण्याचा निर्णय झाला नाही. तर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंबतील असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. “घोषणा नको, कृती हवी बंगालला चौकी हवीच !” असा घोषणा गावकऱ्यांनी दिल्या आहेत. दहेगाव पोलीस स्टेशनाबाबत ग्रामस्थांनी निर्धार व्यक्त केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
पंचवीस तोळ्यांचे दागिने लांबवले
वाळूज महानगर कार्यक्रमाहून घरी येत असताना एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी ओरबाडून पलायन केले. ही घटना सिडको वाळूज महानगरात घडली. सिडको वाळूज महानगर येथील प्लॉट नं ७४ येथील तिरुपतीनगरात राहणाऱ्या सुमन अमरनाथ यादव या बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री विपुल उपाध्याय यांच्या घरी असलेला कार्यक्रम आटोपून घरी येत होत्या. सुर्यवशीनगरकडून जिजाऊ चौकाकडे जात असतांना एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या तीन जणांपैकी एकाने सुमन यादव यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला. यामध्ये सोन्याची एक चैन, सोन्याचे बारीक एक चैन पैडल, अशा १ लाख २१ हजार रुपये किमतीच्या दागिण्यांचा समावेश होता. या प्रकरणी एमआडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अरविंद शिंदे करीत आहे.