इंदापूरमध्ये भरणेंची विजयाची हॅट्रिक; हर्षवर्धन पाटलांचा दारुण पराभव
इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा १९,२८४ हजार मतांनी दणदणीत पराभव करीत विजयाची हॅट्रिक केली. भरणे यांच्या विजयाच्या हॅट्रिक बरोबरच हर्षवर्धन पाटील यांच्या पराजयाची ही हॅट्रिक झाली. पाटील यांनी या निवडणुकीसाठी लावलेली मोठी ताकद अखेर फोल ठरली. अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना ३३ हजाराहून अधिक मते मिळाली.
अत्यंत लक्षवेधी व चुरशीच्या ठरलेल्या इंदापूर विधानसभा निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांना जवळपास १ लाख १६ हजार ७४८ जास्त मते मिळाली तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना ९७,६७३ हजार मते मिळाली. तसेच या निवडणुकीत लक्षवेधी ठरलेले अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना ३७,८४३ हजार मते मिळाली. त्यामुळे माने यांची उमेदवारी भरणे यांच्या पथ्यावर पडली. तर हर्षवर्धन पाटील यांना माने यांच्या उमेदवारीमुळे मोठा फटका बसला.
हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला राम राम करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यामुळे ही निवडणूक संपूर्ण राज्यात गाजली होती. खासदार शरद पवार यांची ताकद पाटील यांच्या मागे असल्याने हर्षवर्धन पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत हर्षवर्धन पाटील यांचेच पारडे जड वाटत होते. परंतु, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या दहा वर्षात तालुक्यासाठी खेचून आणलेला साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी, निवडणूक जाहीर होण्याअगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जंक्शन या ठिकाणी प्रस्तावित एमआयडीसी साठी दिलेली मंजुरी आणि भरणे यांनी इंदापूर तालुक्यात लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे केलेली अंमलबजावणी याचा मोठ्या प्रमाणात फायदा भरणे यांना या निवडणुकीत झालेला दिसून आला. त्याचबरोबर गेली दहा वर्ष आमदार असलेले भरणे यांनी सर्वसामान्यांशी वैयक्तिकरित्या ठेवलेला संपर्क त्यांना हक्काची वोट म्हणून कामाला आला.
जातीय समीकरणामुळे दत्तात्रय भरणे अडचणीत येतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. हर्षवर्धन पाटील यांच्याकरिता शरद पवार यांनी सणसर व इंदापूर या दोन ठिकाणी सभा घेतल्या होत्या. जयंत पाटील यांनी काटी तर खा.अमोल कोल्हे यांनी निमगाव केतकी या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्याकरिता सभा घेतली होती. या सभांना झालेली गर्दी पाहता भरणेंपुढे मोठे कडवे आव्हान उभे राहिले होते. परंतु, दत्तात्रय भरणे यांनी हेच कडवे आवाहन स्वीकारून निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे.
हे सुद्धा वाचा : मोहोळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का; शरद पवारांची तुतारी वाजली
जेसीबीच्या साह्याने गुलाल अन् फुलांची उधळण
दत्तात्रेय भरणे यांचा विजय झाल्यानंतर शहरातील बाबा चौक येथे भरणे यांच्यावर गुलालाची व फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. त्यानंतर राधिका रेसिडेन्सी या ठिकाणी विजयाची सभा पार पडली.
भरणेंनी परिधान केला पुन्हा तो लकी शर्ट…
सन २०१४, २०१९ च्या विजयानंतर परिधान केलेला लकी चौखडा शर्ट पुन्हा २०२४ चा विजयी मिळविल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी परिधान करीत विजयी मिरवणुकीत हजेरी लावली.