दिशा सालियन मृत्यूप्रकरणात शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा नेते आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, असा उल्लेख याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं जात होतं. त्यांची चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या प्रकरणावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
दिशा सालियन मुंबईत एका कंपनीत टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करत होती. 8 जून 2020 रोजी तिचा मृत्यू झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा खाली पडली होती.या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. यानंतर दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात सातत्याने आवाज उठवला होता. आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणाशी जोडलेलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे. मात्र दिशाच्या वडिलांनी यापूर्वी या प्रकरणी आपली काहीही तक्रार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु आता अचानक मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा या प्रकरणावर भाष्य केलं आहे., मी पहिल्या दिवसापासून हेच सांगतोय. दिशा सालियनचा खून झाला होता. आदित्य ठाकरेंचं ८ जूनचं मोबाईल लोकेशन तपासा, तिथल्या वॉचमनचं काय झालं? हे मी विचारत होतो. आज तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे आता काय बोलणार? आता तर थेट तिच्या वडिलांनीच गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांना सत्ताधाऱ्यांनी घेरलं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या प्रकरणामध्ये मी बातम्या वाचत आहे. बातम्या देत असताना वस्तुस्थितीला धरून बोललं पाहिजे. तुम्ही पण वस्तुस्थितीला धरूनच बातमी दिली पाहिजे. हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं आहे. तिचे वडील न्यायालयामध्ये गेले आहेत, न्यायालय काय तो निर्णय देईल, असे अजित पवार यांनी म्हटले.