बारामती: Ajit Pawar win Malegaon Election: संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री नीलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. मात्र या निवडणुकीमध्ये विरोधी गटातील सहकार बचाव पॅनेलचे नेते व माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे हे ५९३ मतांनी पराभूत झाले, मात्र त्यांचे सहकारी व ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे हे एकमेव विरोधी उमेदवार विजयी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या चुरशीच्या निवडणुकीत माळेगाव कारखान्यावर एकहाती सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाले.
सलग दोन दिवस चाललेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीमध्ये सर्वच ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली, काही गटात पॅनल टू पॅनल, तर अनेक ठिकाणी क्रॉस वोटिंग झाल्याचे समोर आले. गेली अनेक वर्ष माळेगाव कारखान्याचे संचालक म्हणून काम केलेले तसेच कारखान्याचे अध्यक्ष म्हणून देखील काम केलेले रंजनकुमार तावरे यांचा पराभव विरोधी गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून पूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये पणाला लावली होती. ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून त्यांनी स्वतः एकतर्फी विजय मिळवला, नीलकंठेश्वर पॅनलच्या विजयाचे खाते उपमुख्यमंत्री पवार यांनी उघडल्यानंतर मतमोजणी मध्ये सर्वच गटात चुरस पाहायला मिळाली, त्यामुळे सुरुवातीला श्री नीलकंठेश्वर पॅनलचे राखीव गटातील उमेदवार ४०० ते ५०० मतांनी आघाडीवर होते.
मोठी बातमी! माळेगाव कारखाना निवडणुकीत हार की जीत? अजित पवारांच्या पॅनेलबाबत समोर आली ‘ही’ बातमी
मात्र तरी देखील सत्ताधारी श्री नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दिनांक २४ जून रोजी सकाळी नऊ वाजता मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर रात्रभर मतमोजणी सुरू होती. सायंकाळी सात नंतर श्री नीलकंठेश्वर पॅनलचे १९ उमेदवार आघाडीवर होते, तर तर सहकार बचाव पॅनलचे नेते चंद्रराव तावरे, महिला राखीव गटातील राजश्री कोकरे, वीरसिंह खलाटे, रणजीत खलाटे आघाडीवर होते. उर्वरित सर्वच ठिकाणी सत्ताधारी श्री नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते.
बुधवारी (दि २५) दुपारनंतर मात्र दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीमध्ये विरोधी गटातील आघाडीवर असलेले तीन उमेदवार पुन्हा मागे पडले. यानंतरच्या मतमोजणीत चंद्रराव तावरे वगळता सहकार बचाव पॅनलचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने मागे पडले. त्यानंतरच्या मतमोजणी मध्ये चंद्रराव तावरे ५०० हून अधिक मताधिक्याने आघाडीवर आले. दरम्यान, श्री नीलकंठेश्वर पॅनलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी झाले. यामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्यासह तानाजीराव कोकरे, योगेश जगताप, स्वप्निल जगताप, नितीन सातव विलास देवकाते, अविनाश देवकाते, संगीता देवकाते यांच्यासह इतर १३ उमेदवारांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून विजयी झाले उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीर केल्याप्रमाणे माळेगावचे अध्यक्ष होणार का?, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी व गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.