माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत कोण जिंकणार? (फोटो- सोशल मिडिया)
बारामती: तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून विजयाचे खाते उघडले, तर इतर मतदार संघातून उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री नीलकंठेश्वर पॅनेलचे १९ उमेदवार सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हाती आलेल्या कलनुसार ४०० ते ५०० मतांच्या फरकाने आघाडीवर होते.
मात्र विरोधी चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव पॅनेल मधील महिला राखीव मधील राजश्री कोकरे या ५०० मतांनी आघाडीवर होत्या. एकूण मतमोजणी पहाटेपर्यंत सुरू राहणार होती. मात्र साडेसहा वाजेपर्यंत चे चित्र सत्ताधारी श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या बाजूने झुकल्याचे झालेल्या मतमोजणी दिसून आले.
बारामती शहरातील प्रशासकीय भवन मधील अभियांत्रिकी विभागाच्या इमारतीमध्ये सकाळी नऊ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून १०२ पैकी ९१ मते मिळाल्याने त्यांनी एकतर्फी विजय मिळविला, त्यांच्या विरोधातील भालचंद्र देवकाते यांना १० मते मिळाली. यानंतर अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, महिला राखीव या मतदारसंघातील मतमोजणीस प्रारंभ झाला. यामध्ये देखील ३०० ते ४०० मताधिक्याने श्री नीलकंठेश्वर पॅनल मधील या मतदारसंघातील उमेदवार आघाडीवर होते. यानंतर सुरू झालेल्या मतमोजणीत इतर मतदारसंघांमधील चित्र बदलेल अशी शक्यता होती.
मात्र अन्य देखील मतदार संघामध्ये श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांनी ४०० ते ५०० मतांनी साडेसहा वाजेपर्यंत आघाडी घेतली होती, परंतु विरोधी सहकार बचाव पॅनल मधील महिला राखीव मधील राजश्री कोकरे या ४०० ते ५०० मतांनी आघाडीवर होत्या. माळेगाव गटातील प्रकार बचाव पॅनलचे नेते रंजनकुमार तावरे त्यांच्या हक्काच्या मतदार संघात पीछेहाट झाल्याचे दिसून आले. दरम्यान साडेसहा वाजेपर्यंतचे चित्र पाहता महिला राखीव गटातील विरोधी उमेदवार वगळता अन्य सर्व मतदार संघामध्ये सत्ताधारी श्री नीलकंठेश्वर पॅनलनेच सायंकाळी साडेसहा पर्यंत आघाडी घेतल्याचे दिसून आले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुरस्कृत बळीराजा सहकारी पॅनलला फारसा प्रभाव दाखवता आला नसला तरी, त्यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहता त्याचा फटका सहकार बचाव पॅनलला बसल्याचे दिसून आले.
दरम्यान बहुतांश ठिकाणी क्रॉस वोटिंग झाल्याचे दिसून आले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णपणे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लावलेल्या सर्व प्रकारे ताकदीला यश आल्याचे सायंकाळी सात वाजेपर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या परिस्थितीनुसार स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करून सर्वांनाच धक्का दिला होता, त्यातच अध्यक्ष पदाचा उमेदवार देखील स्वतःच्या नावाची घोषणा त्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर आणखी ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत त्यांच्या रणनीतीला यश आले. दरम्यान सांगवी मतदारसंघांमध्ये सहकार बचाव पॅनलचे नेते चंद्रराव तावरे हे निवडणूक लढवत होते, या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद पणाला लावली, त्याचबरोबर माळेगाव गटात देखील त्यांनी त्याच पद्धतीने ताकद पणाला लावली. एकंदरीत सायंकाळी सात वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एक उमेदवार वगळता अन्य २० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री नीलकंठेश्वर पॅनलच बाजी मारेल असे चित्र स्पष्ट झाले