मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘बॅरिस्टर’ पदवी देण्याबाबत हालचाली वाढल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. अद्यापही त्यांना भारतरत्न न मिळाल्यामुळे अनेकदा वादंग निर्माण होत असतात. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यांना मरणोत्तर बॅरिस्टर पदवी देण्यात यावी याबाबत मागणी केली आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘बॅरिस्टर’ पदवी दिली जावी, याबाबत केंद्र सरकारला विनंती करण्यात येणार आहे. याबाबत केलेल्या ट्वीटरवरील पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीसांनी लिहिले आहे की, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाच्या वतीने कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. पारिजात पांडे यांनी उपमुख्यमंत्र्यांना यासंदर्भातलं एक निवेदन दिलं. या निवेदनात सावरकरांना मरणोत्तर ‘बॅरिस्टर’ उपाधी प्रदान केली जावी, अशी मागणी केली आहे. यांदर्भात देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी कौन्सिलकडून करण्यात आली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
नेमकं काय लिहिले आहे पोस्टमध्ये?
“स्वातंत्र्यवीर सावरकर हे १९०६ मध्ये ब्रिटनला गेले आणि तिथे त्यांनी आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. मात्र उत्तीर्ण होऊनही त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक म्हणून असणाऱ्या योगदानामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना बॅरिस्टर उपाधी प्रदान केली नाही. आता ती बॅरिस्टरची उपाधी मरणोपरांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रदान करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती करणारे एक निवेदन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष अॅड. पारिजात पांडे यांनी दिले. यासंदर्भात केंद्र सरकारला पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे”, अशी माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे 1906 मध्ये ब्रिटनला गेले आणि तेथे त्यांनी आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. मात्र उत्तीर्ण होऊनही त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक म्हणून असणाऱ्या योगदानामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना बॅरिस्टर उपाधी प्रदान केली नाही. आता ती बॅरिस्टरची उपाधी… pic.twitter.com/hkdiaHOa98
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) February 26, 2024