Eknath Shinde: राहुल गांधींच्या 'त्या' ट्वीटवरून एकनाथ शिंदेंची जोरदार टीका; म्हणाले, "ते नेहमीच महाराष्ट्रातील..."
Chatrapati Shivaji Maharaj 2025: आज संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये जाणता राजाला अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या. मात्र कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर छत्रपती शिवरायांना जयंतीदिनी श्रद्धांजली वाहिली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटवरून राजकारण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी देखील राहूल गांधी यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये नेमके राहुल गांधी काय म्हणाले होते, ते जाणून घेऊयात.
राहुल गांधींचे ट्वीट
कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यांची ही पोस्ट भरकटली आहे. जयंतीदिनी त्यांनी शिवरायांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील,” अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना त्यांनी श्रद्धांजली वाहिल्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे.
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं। अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी। उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा। pic.twitter.com/1jOCYOkrC1 — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2025
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी ही चूक जाणूनबुजून केली आहे. ते नेहमीच महाराष्ट्रातील वीरपुरुषांचा अपमान करतात. वीर सावरकर यांचा देखील अपमान ते करतात. त्यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे. राहुल गांधी यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा नाही तर, महराष्ट्राचा आणि शिवभक्तांचा अपमान केला आहे. स्वरा भास्कर असो वा राहुल गांधी, जे महापुरुषांचा अपमान करतात त्यांचा मी निषेध करतो.
#WATCH | Mumbai | Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde says, "Today is Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary. On this occasion, Shiv Jayanti is being celebrated with great enthusiasm across the country and Maharashtra… On the other hand, Rahul Gandhi's… pic.twitter.com/D3T2qx3T1m — ANI (@ANI) February 19, 2025
नीलेश राणे यांची देखील टीका
मी दरवर्षी शिवप्रेमी म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्यावर येतो. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे दैवत आहेत. हा उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे. खरंतर राहुल गांधी जे भाषण करतायेत ते मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आहे. ते जे भाषण करतात ते चायनाच्या फेवरमध्ये करतात. आपल्या देशाचं काहीतरी चांगलं व्हावं असं त्यांना वाटत नाही. ते परदेशात जरी गेले तरी भारताची बदनामी करतात. मुळात राहुल गांधी हा फॉरेनर आहे, भारतीय नाही. फक्त त्याचा पासपोर्ट भारतीय आहे.
हेही वाचा: “मुळात राहुल गांधी हा भारतीय नाही तो…; शिवरायांचा अपमान केल्यामुळे आमदार निलेश राणेंचा घणाघात
ज्याला आदरांजली आणि श्रद्धांजली यातील फरक माहित नाही, संस्कृती माहित नाही, राजे माहीत नाहीत, आपला इतिहास माहीत नाही आणि कोणीतरी त्याला ट्विट लिहून देते. या व्यक्तीबरोबर मी काम केलं आहे. नेता बनवण्याची एकही कॉलिटी त्याच्याकडे नाही. त्याच्याकडे अभ्यास नाही. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. त्यांच्याकडे कुठलीच क्वालिटी नसल्याने त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने माफी मागायला हवी.