Eknath Shinde: "तिकडे लागली वाळवी म्हणूनच..."; राजन साळवींचा पक्षप्रवेश अन् एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
शिवसेनेचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. राजन साळवी हे मागील अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अखेर आज राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साक्षीने राजन साळवी यांनी धनुष्यबाण हाती घेतले आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला जोरदार टोला लगावला आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशादरम्यान बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “कोकणातील ढाण्या वाघ शिवसेनेच्या गुहेत परत आला. या पक्षात राजा का बेटा राजा नही बनेगा. जो काम करणार तोच पुढे जाणार. शिवसेना हा पक्ष हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. जिथे विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी. जिथे लागेल वाळवी तिथे कसा राहील राजन साळवी असे बॅनर मी वाचले.”
राजन साळवी अखेर शिवसेनेत
मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या नाराजीची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा झाली. मात्र आता राजन साळवी हे शिवसेनेत करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे. विरोधकांनी तपास यंत्रणाच्या चौकशीचा ससेमीरा मागे लागल्यामुळे राजन साळवी शिंदे गटामध्ये जाणार असल्याची टीका केली होती. मात्र आता राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राजन साळवी यांनी पक्षप्रवेशापूर्वी पत्रकार परिषद घेत शिवबंधन तोडण्याचे कारण देखील सांगितले आहे. राजन साळवी म्हणाले की, “नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं. विनायक राऊत हेच माझ्या प्रभावाला कारणीभूत असून, त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केलं. याबाबत मी उद्धव ठाकरे यांना पुरावे दिले आहेत. मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे,” असे मत राजन साळवी यांनी व्यक्त केले आहे.
कोण आहेत राजन साळवी?
राजन साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राजकीय वर्तुळामध्ये ओळखले जातात. ते राजापूर विधानसभेचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1993 ते 94 च्या सुमारास ते शिवसेनेत सक्रीय झाले. त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेचे नगराध्यक्षपद भूषवलं होतं. राजन साळवींनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुखपदही सांभाळलेले आहे. 2009 च्या निवडणुकीमध्ये ते पहिल्यांदा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. मात्र आत्ताच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांकडून राजन साळवींचा पराभव झाला. त्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीत विनायक राऊतांनी मदत न केल्याचा आरोप राजन साळवींनी केला आहे. अवैध मालमत्ताप्रकरणी एसबीकडून राजन साळवींच्या घरी छापेमारी करण्यात आली होती.