एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना; दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता, नक्की काय घडतंय?
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी अचानक दिल्लीला रवाना झाले. विशेष म्हणजे त्यांच्या या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता राखण्यात आली. अगदी त्यांच्या काही मंत्र्यांनाही याबद्दल कल्पना नव्हती. दिल्लीतील वातावरण तापलेले असताना आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शिंदेंच्या दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दिल्लीमध्ये शिंदे हे त्यांच्या शिवसेना गटातील खासदारांशी संवाद साधणार आहेत. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. त्याचवेळी शिंदे यांनी आपल्या खासदारांना एकत्र बोलावणं ही केवळ रणनीती ठरवण्यापुरती गोष्ट नाही, तर त्यामागे काही अंतर्गत दबाव असून तो हाताळण्याचा प्रयत्न आहे, असं जाणकारांचे मत आहे.
महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजीचं वातावरण आहे. विशेषतः भाजप आमदारांनी शिंदे गटावर निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. नगरविकास खात्याच्या माध्यमातून शिंदे गटाच्या मतदारसंघांना प्राधान्य दिलं जात असल्याची तक्रार काही भाजप आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावर फडणवीस यांनी सर्व प्रस्तावांची अंतिम मंजुरी स्वतःच्या देखरेखीखाली देण्याचे निर्देश दिले आहेत.
तसंच शिंदे गटातील काही नेत्यांनी अलीकडच्या काळात निर्माण केलेल्या वादामुळे सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कँटीनमधील कर्मचाऱ्यावर हात उचलल्याची घटना ताजी असतानाच, मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसोबतचा व्हिडीओ आणि भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. या सगळ्यांमुळे महायुती सरकारची प्रतिमा डागाळली आहे.
महायुतीचे धाबे दणाणले; उद्धव ठाकरे थेट घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट
गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा एक गट फोडत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि महायुतीमध्ये प्रवेश केला. यामुळे एकनाथ शिंदेंची अडचण झाली. त्यांच्या राजकीय मोक्याच्या जागेवर स्पर्धा निर्माण झाली. एकनाथ शिंदे यांचा ‘मुख्यमंत्रीपदाचा चेहरा’ आणि ‘शिवसेना ब्रँड’ यावर दबाव वाढला. अजित पवारांच्या कार्यक्षमतेची छाप, प्रशासकीय अनुभव आणि भाजपशी असलेली जवळीक हे सगळं शिंदे गटाच्या अस्वस्थतेचं मूळ आहे, असं मानलं जातं.
एकनाथ शिंदेच्या खात्यातील निर्णयांवरून आरोप झाले आहेत. गृहनिर्माण योजना, पीएम आवास प्रकल्प, आणि शहरी विकासाच्या टेंडर प्रक्रियेबाबत सध्या अंतर्गत तपास सुरू असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे शिंदे यांचा दिल्ली दौरा या अनुषंगानेही पाहिला जात आहे.