जातवैधता प्रमाणपत्रासाठी पुन्हा मुदतवाढ; विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी
छत्रपती संभाजीनगर : जातवैधता प्रमाणपत्रासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वी मुदतवाढ मिळूनही प्रमाणपत्र सादर न केलेल्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे.
अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना या मुदतवाढीचा लाभ होणार आहे. यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ दिली होती. यासाठी यापूर्वी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, सुरुवातीला सहा महिने व त्यानंतर, तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही काही विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी मुदतवाढ मिळूनही प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांना ही शेवटची संधी आहे. यानंतर मुदत मिळणार नाही. तसेच वाढीव मुदतीत प्रमाणपत्र सादर केले नाही तर संबंधित विद्यार्थीच जबाबदार राहतील, असे तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रिया सुरु
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी एम. टेक केमिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, रोबोटिक्स अँड प्रोसेस ऑटोमेशनसह एम.एस्सी. मटेरिअल सायन्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
दोन सप्टेंबरपर्यंत नोंदणी आवश्यक
पात्र विद्यार्थ्यांना २ सप्टेंबर २०२५ पर्यंत नोंदणी करता येईल. या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ९ सप्टेंबर २०२५ रोजी घेतली जाणार असून, १० सप्टेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. ११ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रवेशासाठी नोंदणी केली जाणार आहे.