Decision to provide houses to sanitation workers in Pandharpur revised development plan
Pandharpur Revised Development Plan : पंढरपूर : नुकताच राज्यामध्ये आषाढी वारी सोहळा समाप्त झाला आहे. आषाढी वारीसाठी लाखो वारकरी, भक्तगण हे पंढरपूरामध्ये दाखल होत असतात. आषाढी एकादशी आणि त्यानंतरचे अनेक दिवस पंढरपूरामध्ये वारकऱ्यांचा अक्षरशः पूर आलेला असतो. या सर्व वारकऱ्यांना स्वच्छ व सुंदर वारी अनुभवण्यास मिळावी यासाठी सफाई कामगार अहोरात्र काम करत असतात. सफाई कामातून ते अनोखी ईश्वरसेवा करत असतात. पंढरपूरातील सफाई कर्मचाऱ्यांना आता विठूराय पावला आहे. राज्य सरकारकडून त्यांना ६०० चौरस फुटांची घरे देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पंढरपूर तीर्थक्षेत्र सुधारित विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामांचा समावेश आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर शहरातील 213 सफाई कामगारांना प्रत्येकी 600 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील. त्यासाठी 55 कोटी 61 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते. पंढरपूर शहरातील सफाई कामगारांना घरे देण्याच्या प्रकल्पामध्ये एकूण 13 इमारती आणि 213 रहिवासी युनिट आहेत. या १३ इमारतींपैकी १२ इमारती ४ मजली असून, एक इमारत ५ मजली आहे. त्यामध्ये रस्त्यालगत असलेल्या ७ इमारतींमध्ये २४ दुकानांचे गाळे आहेत. या सफाई कामगारांना लवकरात लवकर घरे देण्याच्या दृष्टीने आजच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि त्यांना योग्य ते निर्देश देण्यात येतील. या सफाई कामगारांच्या प्रलंबित घरांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात येईल आणि त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आषाढी यात्रेदरम्यान विठ्ठल मंदिराला मिळाले 10 कोटी 84 लाखांचे उत्पन्न
आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी 10 कोटी 84 लाख रुपयांचे दान अर्पण केले. तसेच सोने-चांदीचे दागिने अर्पण केले असून, मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या. आषाढ शुद्ध 0१ (दि.२६) ते आषाढ शुध्द १५ (दि.१०) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ७५०५२९१ रुपये अर्पण, २८८३३५६९ रुपये देणगी, ९४०४३४० रुपये लाडू प्रसाद विक्री, ४५४१४५८ रुपये भक्तनिवास, १४४७१३४८ रुपये हुंडीपेटी, ३२४५६८२ रूपये परिवार देवता, २५९६१७६८ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून १२४५०७५ रुपये व ३ इलेक्ट्रिक रिक्षा / बसचे ३२ लाख इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.