विधीमंडळाच्या आवारामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या हालचालींवरुन राजकारणात चर्चेला उधाण आले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून अनेक मुद्द्यांवरुन नेत्यांमध्ये वाद पेटला आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांना विधीमंडळातून निरोप देण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य जमले होते. त्यानंतर विधीमंडळाच्या आवारामध्ये पायऱ्यांवर सर्व सदस्यांचे फोटोशूट पार पडले. मात्र या फोटोसेशनवेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील हालचाल आणि देहबोली ही चर्चेचा विषय ठरली आहे.
ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी फोटोसेशन वेळी घडलेल्या घडामोडी या अतिशय बोलक्या होत्या. तसेच राज्याच्या राजकारणाची स्थिती आणि नाराजी दर्शवणाऱ्या होत्या. फोटोसेशनवेळी शेवट आगमन झालेल्या उद्धव ठाकरे यांचा विधीमंडळातील दरार दिसून आला. ते येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उभे राहिले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरील हास्य देखील स्पष्ट दिसून येत होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हालचाली देखील कॅमेऱ्याने अचूक टिपल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
फोटो काढण्यासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. यावर मध्यभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बसले होते. त्यांच्या शेजारी उपमुख्यंत्री अजित पवार हे बसले होते. एकनाथ शिंदे येताच ते जवळच असणाऱ्या खुर्चीवर बसले. एकनाथ शिंदे यांच्या शेजारी एकच खुर्ची रिकामी राहिली होती. यानंतर फोटोसाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याजवळ बसणे टाळले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
फोटोसेशनसाठी आलेले उद्धव ठाकरे हे आल्यानंतर खूप वेळ उभे होते. एकनाथ शिंदे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी पाहिले सुद्धा नाही. एकनाथ शिंदे हे देखील उद्धव ठाकरेंकडे पाठ करुन उभे होते. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंशेजारी बसण्यासाठी विनंती केली. मात्र उद्धव ठाकरे हे त्यांच्या शेजारी बसलेच नाही. अखेर तो क्षण नीलम गोऱ्हे यांनी सावरुन घेतला. यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बसल्या. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शेजारी न बसता भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शेजारी बसणे पसंत केले. यावरुन राज्यामध्ये सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीचे स्वरुप स्पष्टपणे दिसत आहे.