
ऑक्टोबर महिन्यात डेंग्यू रुग्णसंख्येत घट
पुणे : पुण्यात ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात पावसामुळे डासांची वाढ झाली होती, त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र, आता हवामानातील बदल आणि महापालिकेच्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसत आहे.
गेल्या आठवड्यात शहरात डेंग्यूचे 17 संशयित रुग्ण आढळून आले, परंतु कोणाच्याही चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात 229 संशयित रुग्ण नोंदवले गेले, त्यापैकी फक्त 6 जणांमध्ये डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने डासोत्पत्ती स्थाने आढळून आलेल्या आस्थापनांवर कारवाई सुरू ठेवली आहे.
जुलै महिन्यात 680, ऑगस्टमध्ये 451 आणि सप्टेंबरमध्ये 278 आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्या काळात अनुक्रमे 1 लाख 29 हजार 50, 1 लाख 52 हजार 50 आणि 68 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात फक्त 18 आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या असून, 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.
हेदेखील वाचा : पायातील ‘हे’ बदल ठरतील जीवघेणे! वाढतील आजार, जाणून घ्या
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात शहरात चिकुनगुनियाचा एकही रुग्ण आढळून आला नाही, तर मलेरियाचे फक्त तीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. शहरातील कीटकजन्य आजारांवर नियंत्रण येत असले तरी नागरिकांनी घरात व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पायातील बदल ठरतील जीवघेणे
आपल्या पायांमध्ये दिसणारे बदल अनेकदा शरीरातील आरोग्याच्या समस्या ओळखण्याचे पहिले लक्षण असतात. बऱ्याचदा आपण आपल्या पायांकडे फार लक्ष देत नाही. पण पायांमध्ये होणारे बदल आपल्याला गंभीर आजाराची सूचना देऊ शकतात. जर वेळेवर लक्ष दिले आणि योग्य उपचार सुरू केले तर समस्या वाढण्यापासून रोखता येते.