सत्ता आली तरी माज नको अन् गेली तरी...; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला
दौंड : “सरकार येत असते, जात असते. सगळेच कायम एका ठिकाणी राहतात असे नाही. जसे चार दिवस सासूचे असतात तसेच चार दिवस सुनेचेही येतात. त्यामुळे सत्ता आली म्हणून माज करू नका आणि सत्ता गेली म्हणून खचू नका,” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना वास्तववादी संदेश दिला. ते दौंड शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित ‘जाहीर प्रवेश व संवाद मेळावा’ या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी नव्याने पक्षात दाखल झालेल्यांना मान-सन्मान देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार रमेश थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, गुरुमुख नारंग, महेश भागवत, तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे माजी दौंड शहराध्यक्ष स्वप्निल शहा, माजी नगरसेवक नंदू पवार, मनोज फडतरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
“दौंड म्हणजे मिनी भारत”
अजित पवार म्हणाले, “दौंड हे महाराष्ट्राला जोडणारे एक महत्त्वाचे जंक्शन आहे. येथे विविध जाती-धर्मांची माणसे गुण्यागोविंदाने राहतात. व्यापारी वर्ग मेहनती आहे आणि नवीन पिढी व्यापार क्षेत्रात पुढे येत आहे. शहराला जोडणारे रस्ते, रेल्वे व्यवस्था उत्तम आहे. या शहरात विकासाची प्रचंड क्षमता आहे.”पुढे बोलताना त्यांनी बारामतीच्या विकासाचा दाखला देत सांगितले की, “बारामतीत आम्ही शिक्षण संस्था उभ्या केल्या, दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे बाजारपेठ फुलली आहे. काही लोक म्हणतात बारामतीचा विकास आणि इतर शहरांची उपेक्षा हे खरे नाही. मी सर्वांना समान मदत केली आहे. पण निधी योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे तरच शहराचा विकास होतो.”
सर्वांगीण विकासाचे ध्येय
अजित पवार म्हणाले, “सकाळी सहा वाजल्यापासून लोकांच्या अडचणी समजून घेणे, सर्वांना बरोबर घेऊन काम करणे हाच विकासाचा मार्ग आहे. दौंड तालुक्यातील अनेक रस्त्यांसाठी मी निधी दिला आहे. अष्टविनायक मार्गासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च केले जात आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “बारामती आणि दौंड वेगळी नव्हती. तालुक्यात शैक्षणिक संस्था काढल्या, उद्योगांना हातभार लावला. निवडणुकीत राजकारण होते, पण त्यानंतर जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे लागते. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच खरे काम आहे.”
“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा आमच्या राजकारणाचा पाया”
अजित पवार यांनी आपल्या भाषणात विचारधारात्मक स्पष्टता दाखवली. ते म्हणाले, “आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे ‘बेरजेचे राजकारण’ पाहिले आहे. आम्ही नेहमी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून पुरोगामी विचार मांडतो. जात, धर्म, नातीगोती यावर राजकारण कधीच केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जाती व १२ बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तोच आदर्श आपल्या कामाचा असावा.” या कार्यक्रमात पूरग्रस्तांना मदतीचा हात देत स्वप्निल शहा यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १,५५,५५५ रुपयांचा धनादेश अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्द केला.