Devendra Fadnavis unveils statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Badlapur
कल्याण : उद्या (दि.19) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाणार आहे. यासाठी सर्वत्र कार्यक्रमांची, शोभा यात्रा आणि मिरवणूकांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बदलापूरमध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बदलापूरमध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्थानिक नेत्यांसह अनेक शिवप्रेमी मोठ्या उत्साहामध्ये उपस्थित होते. यावेळी फुलांचा वर्षाव करत लाडका भाऊ आमचा देवा भाऊ असे पोस्टर हवेत सोडत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे भाजप आमदार किसन कथोरे उपस्थित होते
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “बदलापूरमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली. याबद्दल उपस्थित सर्वांचे आभार मानतो. आज कार्यक्रमाला बहिणीची संख्या इतकी आहे की इथे भाऊ दिसत नाहीत. निवडणुकीत आम्हाला बहिणीचा आशीर्वाद असा मिळाला की, सगळ्यांचा सुपडा साफ केला. त्याबद्दल आईचा आशीर्वाद असा आहे की, आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही,” असा राजकीय टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आज आपण जगतो आहोत, आज आमचा स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा ही जिवंत आहे. याचे एकमेव कारण जर काही असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले. त्या काळात राजेलोक हे मुघलांची गुलामगिरी करायचे त्यावेळेला जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना लढायला शिकवलं. मुघलांकडे मोठे सरदार मोठ्या पगारवर होते ते पगारी नोकरदार होते लढणार मात्र आमचे मावळे मात्र अर्धपोटी राहून त्या ठिकाणी लढायचे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक लढाऊ तर होते पण त्याचसोबत एक नियोजक देखील होते,” अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे ते म्हणाले की, “कोणाकडून टॅक्स घ्यायचा कोणाकडून घेऊ नये, कशा पद्धतीत घ्यायचा आणि कशा पद्धतीत घेऊ नये ही प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञावलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लिहून ठेवली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या देशांमध्ये महिलांना सन्मान देणार राज्य जर कुठलं होतं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होतं आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतलं तर आपल्या सगळ्यांचे रक्त सळसळतं. आमच्यासारखे राज्यकर्ते देखील जेव्हा राज्य करताना त्या ठिकाणी कोणाकडे पाहून राज्य करावे असा मनात विचार येतो त्यावेळी एकीकडे भारताच संविधान असतं आणि त्याचबरोबर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज असतात. ज्यांनी खऱ्या अर्थाने राज्यकारभार कसा चालवायचा याचा वास्तुपाठ आपल्याला दिलेला आहे आणि म्हणूनच हा केवळ पुतळा नाहीये एक प्रेरणाचे स्थान आहे एक असं स्थान आहे,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.