नांदेड: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा कोणताही अंदाज लावता येऊ शकत नाही. राज्याच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. पण निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला, पण आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात पडद्यामागे काहीतरी घडत असल्याचे बोलले जात आहे. अशातच माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांच्या विधानाने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. खतगावकरांनी येत्या दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री होतील आणि देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होतील असे विधान केलं आहे.
“अजितदादा, मी जे बोलतो ते नेहमी खरे ठरते,” असे म्हणत माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांनी अजित पवार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. खतगावकर अजित पवार यांना म्हणाले की, “अशोकराव चव्हाण यांना मी एकदा सांगितले होते की, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री व्हाल – आणि तसेच झाले. मी केंद्रात मंत्री असताना दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये नेहमी राजकारणावर चर्चा व्हायच्या. आजही त्या चर्चा होत असतात. तिथे माझे काही जवळचे मित्र आहेत. ते मला म्हणाले की, येत्या दीड वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत घेऊन जाणार आहेत. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला आजच अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो,” असेही खतगावकर यांनी यावेळी नमूद केले. पण आता खतगावकरांच्या या विधानामुळे राज्याचा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
India-Pakistan ceasefire: युद्धविरामानंतरही पाकिस्तानवर दबदबा कायम; ‘हे’ सहा निर्णय लागू
भास्कर पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. “तुम्ही नांदेडमध्ये तिसऱ्यांदा आला आहात. माझ्या पक्षप्रवेश सोहळ्यात लेंडी धरणासाठी निधीची मागणी केली होती आणि ती तुम्ही अवघ्या एका महिन्यात पूर्ण केलीत. आता याच पद्धतीने लक्ष घातल्यास पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि ५० हजार एकर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल,” असे ते म्हणाले. याचवेळी लेंडी प्रकल्पाप्रमाणेच गोदावरी मनार साखर कारखान्याचा प्रश्नही मार्गी लावावा, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवावा.” अशी विनंती करत खतगावकरांनी यावेळी केली.
“अजितदादा, तुम्ही नांदेड जिल्ह्यात तिसऱ्यांदा आलात, तेव्हा काही मागण्याचा मोह आवरत नाही,” असे म्हणत माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी सौम्य चिमटाही घेतला. “अशोकाच्या झाडाकडून काही अपेक्षा नसते, तसेच अशोक चव्हाण यांच्याकडूनही फारशा अपेक्षा नाहीत,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
Brahmos : ‘ब्राह्मोसची ताकद पाहिलीय का? नसेल तर पाकड्यांना विचारा’; CM योगी कडाडले
अजित पवार यांचे कौतुक करताना ते म्हणाले, “तुमची काम करण्याची पद्धत अत्यंत सकारात्मक आहे. प्रशासनावरची मजबूत पकड, विषयांचा सखोल अभ्यास आणि काम करण्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता — या सगळ्या गोष्टी फार थोड्या लोकांमध्ये पाहायला मिळतात, आणि त्या तुमच्याकडे आहेत. यावेळी आमदार इंद्रनील नाईक यांच्याही भूमिकेचा उल्लेख करत खतगावकर म्हणाले, “इंद्रनील नाईक यांनी मुंबईचे दौरे थोडे कमी करून गावागावांत फिरावे. दादा, आता या सगळ्यांना घेऊन जिल्ह्यात दौरे करा.”