India-Pakistan ceasefire: युद्धविरामानंतरही पाकिस्तानवर दबदबा कायम; 'हे' सहा निर्णय लागू
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव सातत्याने वाढत चालला होता. त्यानंतर चार- पाच दिवसांच्या संघर्षांनतर शनिवारी (१० मे) भारत आणि पाकिस्तानने तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले जे भारतीय लष्कराच्या हाणून पाडले. भारत आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांमधील वाटाघाटींमुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्धबंदी लागू झाली. पण या युद्धबंदीनंतरही भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेले सहा निर्णय काय ठेवले आहेत
सिंधू जल करार निलंबितच
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान युद्धविरामासाठी कोणतीही पूर्वअट ठरवलेली नसून सिंधू जल कराराचा निलंबनाचा निर्णय यापुढेही कायम राहणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याची अधिकृत पुष्टी केली आहे.
हवाई क्षेत्र बंदच
भारताने 30 एप्रिलपासून लागू केलेली पाकिस्तानमार्गे होणाऱ्या किंवा पाकिस्तानातून येणाऱ्या विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद ठेवण्याची घोषणा अद्यापही अमलात आहे.
ऑपरेशन सिंदूर नक्की होते तरी काय…? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितली भारतीय सैन्याची यशोगाथा
पाकिस्तानी कलाकारांवर बंदी
राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव, भारतात पाकिस्तानी कलाकार व अभिनेत्यांवर बंदी कायम राहणार आहे. सर्व ओटीटी आणि मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना पाकिस्तानच्या वेबसिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट व अन्य डिजिटल कंटेंट प्रदर्शित न करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
सीमावर्ती चेक पोस्ट बंद
अटारी-वाघा सीमेवरील एकीकृत चेक पोस्ट सध्या बंद ठेवण्यात आली आहे. युद्धविरामानंतरही ती उघडण्यात आलेली नाही. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या हालचालींनंतर सीमा पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
व्यापारावर निर्बंध कायम
पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर बंदी कायम राहणार आहे. थेट किंवा अन्य देशांमार्गे होणाऱ्या व्यापारालाही यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश दिला जाणार नाही, आणि भारतीय जहाजांनाही पाकिस्तानी बंदरांपर्यंत जाण्यास मनाई आहे.
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच, युद्धबंदीदरम्यान भारतीय हवाई दलाचं मोठं विधान
वीसा सेवा निलंबित
भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व प्रकारचे व्हिसा निलंबित ठेवले आहेत. यामध्ये वैद्यकीय व्हिसालाही आता रद्द करण्यात आले आहे. 27 एप्रिलपूर्वी भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगण्यात आले होते.
या निर्णयांमधून, संघर्ष विरामानंतरही भारत आपल्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही शिथिलता दाखवत नाही. धोरणात्मक कडकपणा कायम ठेवत, दहशतवादविरोधात ठोस भूमिका घेण्याची भारताची भूमिका अधोरेखित झाली आहे.