बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा प्रचार दौरा पुरंदर हवेली परिसरातील देवाची उरूळी येथे सुरू असताना एका धनगर वस्तीवर प्रचारासाठी गेल्या असता धनगर महिला भगिनींनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करत बाळूमामा यांच्या मंदिरात काठी आणि घोंगडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महिलांनी आपल्या पाण्यासंदर्भात व इतर अडचणी सुनेत्रा पवार यांना सांगितल्या. लवकर त्यावर तोडगा काढण्याची विनंती महिला भगिनींनी केली. त्यांच्या विनंतीला मान देत लवकरच आपण पाणी आणि तुमच्या इतर अडचणीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा विश्वास सुनेत्रा पवार यांनी दिला. तसेच निवडणुकीत महायुतीच्या घड्याळ या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे देवाची उरळी परिसरात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्याकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. सुनेत्रा पवार यांच्या प्रचार दौऱ्याला पुरंदर हवेली दौऱ्याला देवाची उरळी परिसरातून सुरुवात करण्यात आली.भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देवाची उरळी येथे त्यांच्या कार्यालयात उमेदवार सुनेत्रा पवार आल्या असता मोठ्या उत्साहात महिला व भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच आम्ही सर्व महायुतीच्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
भाजीपाला विक्रेत्यांशी आपुलकीचा संवाद
सुनेत्रा पवार बारामती तालुक्यात प्रचार दौऱ्यावर असताना उंडवडी सुपे येथे प्रचारासाठी गेल्या होत्या. प्रचार सभा आटोपल्यावर बारामतीकडे निघाल्या असता त्यांनी चक्क भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला विक्रेत्यांचे प्रश्न ऐकून घेतले व त्यांच्या अडचणीवर आपण लवकरच मार्ग काढू, असा विश्वास त्यांना दिला. तसेच यावेळी सर्व मार्केटमध्ये जाऊन भाजीपाल्याच्या भावाची चौकशी करत एक किलो भेंडी व गवार विकत सुद्धा घेतली.
तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या घड्याळ या चिन्हाला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन विक्रेत्यांना व उपस्थित नागरिकांना केले. यावेळी भाजीपाला खरेदीसाठी काही जेष्ठ नागरिक आले होते. त्यांच्याशीही सुनेत्रा पवार यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.