
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त करताना ऐकू येत आहे. ” शिवसैनिक म्हणून ओळख सांगायला लाज वाटते. दिवसभर आमच्यासोबत बैठका करायच्या आणि रात्री भाजप आमदारांसोबत गुप्त बैठका करायच्या, त्यानंतर एबी फॉर्म वाटप,” असे थेट आरोप राजन साळवी यांच्यावर करण्यात आले आहेत.
ऑडिओ क्लिपमध्ये अविनाश खापे थेट बोलताना ऐकू येत आहेत, “शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मुलाच्या हातात कसे गेले? असा सवाल खापे उपस्थित करत आहेत. तसेच, शिवसेनेचे उमेदवार उभे करण्याचा अधिकार भाजप नेत्यांना कोणी दिला? संपर्कप्रमुख म्हणून निर्णय घेण्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर असताना लोकशाही संपवून हुकूमशाही कशी सुरू केली, असा सवालही खापे यांनी केला आहे. त्याचवेळी राजन साळवी यांनीदेखील भाजप आमदारांकडे तिकीटे दिल्याचे कबुल केल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. यापूर्वीही धाराशिवमध्ये तिकीट वाटपात भाजपने हस्तक्षेप केल्यामुळे शिवसेनेचे तिकीट विकले गेल्याचा आरोप शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडून करण्यात आला होता.
या सगळ्या घडामोडींमुळे शिंदे सैनिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. “आम्ही जीव धोक्यात घालून काम करायचं लोक अंगावर येत होते. गद्दार म्हणून हिणवलं गेल, तरीही आम्ही शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरलो. आज मात्र पक्षात लोकशाही राहिली नाही,” अशी खंत कार्यकर्त्यांकडून या ऑडिओ क्लिपमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
धाराशिवमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेनेचा ‘गेम’ केला असल्याचे पक्षाने अधिकृतपणे जाहीर करावे. तसेच, आगामी निवडणूक ही ‘अपक्ष पुरस्कृत आघाडी’ म्हणून लढवण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास राजकारण सोडून घरी बसू, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.
या प्रकरणाशी संबंधित एका ऑडिओ क्लिपमध्ये पदाधिकारी अविनाश खापे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आपण तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते नसून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. मात्र, धाराशिवमध्ये शिवसेनेचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर जिल्ह्याची सर्व सूत्रे तानाजी सावंत यांच्या हातात दिली पाहिजेत, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले आहे.