
निवडणुकीपूर्वीच विकास आराखडा! (Photo Credit - X)
धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांसह त्यांनी मंगळवारी (२५ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवराज नळे, मधुकर तावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कांही काळापूर्वी शहरात भाजपाच्या वतीने डोर टू डोर (दारोदारी) मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांच्या समस्या आणि आणि शहर विकासाबद्दल सूचना जाणून घेण्यात आल्या होत्या. यातील कांही सूचनांना आमच्या जाहीरनाम्यात स्थान देण्यात आले असून एकंदरित सर्व समस्यांच्या निराकरणावर भर देण्यात आला आहे.
त्यासाठी ही पाच मुद्द्यांवर आधारित पंचसूत्री योजना आखण्यात आली असून यावर काम करून शहर विकास साध्य करण्यात येणार आहे. या मुख्य पाच मुद्द्यांमध्ये शहराला चोवीस तास पाणीपुरवठा. रस्ते, नाली, पथदिवे. स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट व अद्यावत साधने आणि उपकरणांचा वापर यावर भर देण्यात येणार आहे. चार कोटींच्या निधीतून आगामी दोन वर्षात शहरात दोन बगीच्यांचे निर्माण करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षात आणखी पंचवीस कोटींची त्यात भर घालून उद्यानांचा विकास आणि वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. अंतिम पाचवा मुद्दा प्रशासन पारदर्शक, गतिमान आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. यामुळे नागरिकांना घरी किंवा कामाच्या ठिकाणाहून आपली कामे करून घेता येतील असे त्यांनी सांगितले आहे.
२४ तास पाणीपुरवठा
धाराशिव शहर आणि जिल्हा दुष्काळी म्हणून ओळख असलेले शहर आहे. मागील काळात तेरणा, रुईभर आणि उजनी धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जात असे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी या योजना त्यांच्या काळात इथे राबविल्या. शहराची झालेल्या वाढीमुळे यात आणखी वाढ करावी लागणार आहे. म्हणून आपल्याकडे शहराला २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या अराखड्यावर काम सुरू आहे. लवकरच ती मूर्त स्वरूपात येईल.
रस्ते व नाल्यांसाठी अधिकचा ३०० कोटींचा निधी
शहरातील रस्ते व नाली यासाठी दीडशे कोटींच्या कामांना कांही काळात सुरुवात होणार असून आगामी काळात यासाठी आणखी तीनशे कोटींचा निधी आपण आणणार असून शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील. नाल्यांची कामे प्रगतीपथावर येतील. भुयारी गटारीच्या बाबतीत ते म्हणाले की कांही तांत्रिक कारणामुळे हे काम थांबले असून कांही काळात आपल्याकडे प्रत्यक्ष जबाबदारी आल्यास लवकरच हे काम मार्गी लागेल.