धाराशिव नगरपालिका निवडणुक प्रचारात नवरदेव मल्हार पाटलांच्या सहभागाने वाढला उत्साह
भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे यांच्यासह प्रभाग क्रमांक १३चे उमेदवार सतीश कदम आणि वैशाली रवी मुंढे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (२४ नोव्हेंबर) संध्याकाळी प्रचार फेरी काढण्यात आली होती. प्रभागातील सर्व मुख्यरस्त्यांनी ही फेरी मार्गस्थ झाली. मार्गावरील व्यापाऱ्यांना अभिवादन करत, गाठीभेटी घेत, शहर विकासासाठी भाजपाला साथ देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रभागातील ठिकठिकाणच्या मंदिरात देवांना नमस्कार करून आशीर्वाद घेण्यात आले. अगदी दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले डॉ. पद्मसिंह पाटलांचे नातू मल्हार पाटील स्वतः प्रचार मैदानात उतरल्याने औत्सुक्य आणि कुतूहलाने या प्रचार फेरीस प्रभागातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत होते.
या वेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह शहरातील व प्रभागातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीला प्रभागातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. वातावरण जयघोषाने आणि विजयी निर्धाराने दणाणून गेले होते. धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी ‘कमळ’ चिन्हावर बटण दाबा. असे आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, धाराशिव नगरपालिका निवडणुकीत सुरूवातीपासून भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्रितपणे निवडणुक लढवणार होते. या संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये तशा चर्चा देखील झाल्या होत्या. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याशी युती करू आम्हाला 17 जागा देण्याचं कबूलही केलं होतं. त्याचबरोबर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देखील दिला होता. मात्र आता भाजपने अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 17 उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याऐवजी आमच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुरुज साळुंखे यांनी केला आहे. या घटनेने शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत मोठा दगाफटका झाला आहे.






