राजापूर शहरात येणाऱ्या मुख्यरस्त्यावर सुपर बाजारच्या समोर सातत्याने मालट्रक रस्त्यात आडव्या उभ्या असताना व वाहतुकीला सातत्याने अडथळा येत आहे. तरी देखील याठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी त्या गाड्या काढण्याऐवजी इतर वाहन चालक कायद्याचा बडगा दाखवत असल्याने नक्की यांचे गौडबंगाल काय? असा संतप्त सवाल राजापूर वासियांमधून विचारण्यात येत आहे.
राजापूर शहरात असणारे ट्रॅफिक पोलीस नेहमीच शहरात चर्चेचा विषय झालेला आहे. शहरात सातत्याने धुम स्टाइलने गाड्या चालवणारे अल्पवयीन तरुण, जवाहर चौकातील अस्त्यावस्त वाहतुक याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करणारे पोलीस प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना मात्र सातत्याने कायद्याचा बडगा उगारुन त्रास देत असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून वाढल्या आहेत. मात्र राजापूर पोलीस या तक्रारींना केराची टोपली दाखवत असल्याने आता न्याय तरी कुणाकडे मागायचा? असा प्रश्न सर्वसामान्याना पडला आहे.
गुरुवारच्या आठवडा बाजारादिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दल्ल सुरु असते. तर दररोज सकाळी व सायंकाळी या वेळेत शहरात सातत्याने अनेक वाहन चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले आहेत. आपली वाहने कुठेही पार्क करत असतात. त्यातच मुख्यरस्त्यावर असणाऱ्या सुपर बाजार जवळ याच सुपर बाजारातील माल उतरण्यासाठी मोठे ट्रक अर्ध्या रस्त्यावर आडवे लावत असल्याने कायम वाहतुक कोंडीचा सामना शहरवासियांना करावा लागत आहे.
सुपर बाजार समोर अशाप्रकारे ट्रक उभे केलेले असताना येथे कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून ते ट्रक काढण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांना व वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकानाच दमदाटी करत असल्याचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी असणारे वाहतूक पोलीस हे ट्रॅफिक होमगार्ड कर्मचाऱ्यांवर सोडून इतरत्र फिरत असतात. ज्याठिकाणी सातत्याने ट्रॅफिक होते त्या ठिकाणी हे पोलीस कर्मचारी कधीच हजर नसतात. तर शहरातील इतर सुनसान ठिकाणी उभे राहुन कायद्याचे बोलण्यात व्यस्त असल्याने आता शहर वासियांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या सुपर बाजाराला कायम पोलीस कर्मचाऱ्यांकडून कशाही गाड्या लावण्याची सुट दिली जात असल्याने या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुपर बाजारसाठी वेगळे वाहतुकीचे नियम बनवले आहेत का? या सुपर बाजारासमोर आडव्या उभ्या असणाऱ्या वाहनांना कायम अभय का? नेमके काय साटेलोटे आहे? असा संतप्त सवाल आता शहरवासियांमधून विचारण्यात येत आहे.