'राज्यातील दिव्यांग युवकांना रोजगार मिळणार'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा
मुंबई : राज्य सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या योजनेला प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. असे असताना आता राज्यातील दिव्यांग युवांना प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक स्वावलंबन होवून रोजगाराच्या संधी दिव्यांगानाही उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दिव्यांगांना रोजगाराच्या अनुषंगाने कौशल्ययुक्त प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगारासाठी आगामी पाच वर्षांत नोंदणीकृत दिव्यांगांना युडीआयडी देणे, राज्य व केंद्र शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, यामध्ये स्वयंसेवी संस्था देखील दिव्यांगांच्या विकासासाठी पुढे येत आहेत. ‘युथ फॉर जॉब्स’ संस्था व राज्य शासन लवकरच सामंजस्य करार करणार आहे. रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ‘युथ फॉर जॉब्स’ ही संस्था प्राथमिक टप्प्यात विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात शासनास सहकार्य करणार आहे.
याशिवाय, आगामी काळात या कामाची व्यापकता वाढवून राज्यभर या कामाला राज्य शासन गती देणार आहे. यामुळे दिव्यांग युवकांना रोजगार मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे यासाठी शासन नेहमी आग्रही असते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना आणि निर्णय घेतले आहेत.
खाजगी संस्था रोजगार देण्यासाठी येताहेत पुढे
रोजगार देणाऱ्या खासगी संस्थांमध्ये लाईफस्टाईल इंटरनॅशनल, आदित्य बिर्ला फॅशन, रिलायन्स ट्रेंड्स, आयआयएफएल, लक्ष हॉस्पिटल, मीलन कॉफी हाऊस, एचपीसीएल, बीपीसीएल, सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, लोकल ऑटोमोबाईल डीलर्स, दिशा मेन पॉवर अँड सिक्युरिटी या वेगवेगळ्या खाजगी संस्था रोजगार देण्यासाठी पुढे येत आहेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
नोंदणीकृत दिव्यांगांना यूडीआयडी
राज्यात सर्व दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि शासनाकडे त्यांचा अद्ययावत डाटाबेस करणे, यासाठी त्यांची १०० टक्के नोंदणी करणे. नोंदणीकृत दिव्यांगांना युडीआयडी देणे. दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. दिव्यांगाना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी राज्य शासन सवर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येतील
या उपक्रमासाठी शासनाबरोबर विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात प्रथम टप्प्यात ‘युथ फॉर जॉब्स’ ही संस्था काम करणार आहे. राज्य शासन व स्थानिक जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल व संपुर्ण राज्यात केंद्र, राज्य व स्थानिक स्वयंसेवी संस्था या उपक्रमासाठी पुढे येवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांना आहे.