मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका काय? 'या' बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
मुंबई : सध्या महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. गेल्या काही महन्यापासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीही मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. त्यामुळे मनसे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
राज ठाकरे यांच्याबद्ल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चेन्नीथला म्हणाले की, मनसेसंदर्भात काँग्रेस पक्षात कोणताही चर्चा झालेली नाही. मित्रपक्षांशीही यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे परंतु आघाडी किंवा युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार दिले आहेत, असे चेन्नीथला यांनी सांगितले.
पुढे बोलताना चेन्नीथला म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचे पुराव्यासह उघड केले पण निवडणूक आयोग त्यावर समाधानकारक उत्तर देत नाही. निवडणुकीतील घोटाळ्याप्रश्नी इतर राजकीय पक्षांनीही तक्रारी केल्या आहेत. याच प्रश्नावर काँग्रेससह इतर राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) व शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष अब्दुल रशिद अब्दुल अजिज यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह प्रभारी रमेश चेन्नीथला व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, खासदार डॉ. कल्याण काळे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, एम. एम, शेख, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
महायुती सरकारने राज्यातील शेतकरी, लाडकी बहीण, बेरोजगार यांची घोर फसवणूक केली आहे. शेतकरी संकटात असताना त्यांना भरीव मदत देण्याऐवजी जुन्याच योजनांचे एकत्रीकरण करून फसवे पॅकेज जाहीर केले आहे. शेतकरी कर्जमाफीवरही महायुती सरकार बोलत नाही. लाडकी बहीण योजनेतून २१०० रुपये देण्यावर सरकार गप्प आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष आंदोलन, मोर्चे काढून सरकारला जाब विचारेल, असेही चेन्नीथला यांनी सांगितले.
धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
चेन्नीथला पुढे म्हणाले की, राज्यातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे महायुती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून महाराष्ट्रातील सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षातील काही लोक करत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करून महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द भंग करण्याचे षडयंत्र आहे परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काहीही बोलत नाहीत.