शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; द्राक्ष व्यापाऱ्यांसाठी आता...
सांगली : गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची परराज्यातील दलाल आणि व्यापाऱ्यांकडून २५० कोटींची फसवणूक झाली आहे. याबाबत पोलिसात तक्रारीही दाखल आहेत. या गुन्ह्यातील संशयितांवर कठोर कारवाई करण्यासाठी आता सांगली जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात व्यापार करण्यासाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर करून, जिल्ह्यात द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समितीकडे नोंदणी करावी लागणार आहे, ज्यामध्ये आधार, मोबाईल नंबर, यासह इतर महत्वाची माहिती घेतली जाईल, त्यानंतर व्यापाऱ्यांना ‘ क्यू-आर कोड’ देण्यात येईल. तो तपासून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करावा. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
गेल्या काही वर्षात याबाबत शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून पोलीस प्रशासनाने स्वतंत्र पथक नेमले होते, मात्र त्याला फारसे यश आले नाही, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसणवूक टाळण्यासाठी एक व्यापक निर्णय आवश्यक आहे. जो कायदेशीर धोरणात देखील बसेल.
प्रत्येकाची जबाबदारी
” दरवर्षी जिल्ह्यात सर्व बाहेरचे व्यापारी येतात, स्थानिक नेत्यांच्या ओळखीने त्यांना शेतकरी माल देतो. मात्र त्याचे पैसे न देताच तो पसार होतो, यासाठी दरवर्षी टास्क फोर्स सारख्या घोषणा बैठका होतात, मात्र पुन्हा फसवणूक होतेच ती थांबवण्यासाठी आता धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. मागे ते पुढे नको ”
– महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
” पुढील आठवड्यापासून द्राक्षाचा हंगाम जोर धरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी निर्यातीसाठीची द्राक्षे विकली जात आहेत. दिल्ली बाजारात जाणारी द्राक्षे काढली जात आहेत. आठ-दहा दिवसांत हंगामाला गती येणार आहे. देशभरातील व्यापारी सांगलीत दाखल होतील व शेतकऱ्यांच्य बांधावर जातील. काही नवे व्यापारी आहेत, काही जुने असतील. या व्यापाऱ्यांनी आपली नोंदणी बाजार समितीकडे करणे गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी हे आवश्यक आहे”.
– राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली
अनेक वर्षे माल घेणारा अचानक पसार होतो
” शेतकरी आधीच नैसर्गिक संकटात आहेत, त्यातून कसेबसे कर्जकाढुन पिकं वाढवली जातात, चांगले पैसे होतील अशी अपेक्षा असतानाच, गेल्या काही वर्षांपासून नियमित पैसे देणारा व्यापारी अचानक पोबारा करतो, त्यावेळी आपल्याकडे इतक्या वर्षानंतर देखील काहीच नसते, त्यामुळे याबाबत शेतकऱ्यांनी अधिक सजग होण्याची गरज आहे.”
राहुल पाटील, – द्राक्षे उत्पादक, वायफळे ( ता. तासगाव)