
देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! "पराभव समोर दिसत असल्याने...", भाजप नेत्याकडून संताप व्यक्त
भाजप नेते प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठिकठीकाणी शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते. हा बॅनर भाजपचे तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांनी मार्लेश्वर फाटा येथे शुभेच्छा देणारा बॅनर लावला होता. मात्र हाच बॅनर अज्ञातांकडून जाळण्यात आल्याची माहिती समोर आली. हा बॅनर कोणी जाळला? याची अद्याप माहिती मिळाली नाही, मात्र बॅनर जाळल्याप्रकरणावरून तालुकाभरातून कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
सध्या राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांचीही तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. नगर पंचायत निवडणुकीत भाजपने राज्यभरात मोठे यश मिळवले आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अशा परिस्थितीत बॅनर फाडणे किंवा जाळणे ही घटना अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया रुपेश कदम यांनी दिली. तसेच बॅनर जाळने ही घटना म्हणजे विकृत मनोवृत्तीचे दर्शन असून पराभव समोर दिसत असल्याने त्या मानसिकतेतून केलेले हे कृत्य आहे, अशा शब्दात भाजप नेते प्रमोद अधटराव यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. या प्रकरणी घटना स्थळाला देवरुख पोलिसांनी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे.