
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, महात्मा गांधी आणि समाजवादी विचारांचा डॉ. सप्तर्षी यांच्यावर मोठा प्रभाव होता. विविध विषयावरील आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला,त्यासाठी त्यांना अनेकदा अटकही करण्यात आली होती. ‘युवक क्रांती दल’ या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा दिली. कुमार सप्तर्षी यांच्या लेखनातून आणि व्याख्यानांतून तरुणांना वैचारिक दिशा मिळाली आहे. देशात आज संविधान व लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली जात असताना लोकशाही मुल्ये व परिवर्तनवादी विचाराचे व्यक्तीमत्व आपल्यातून जाणे ही मोठी हानी आहे.
सत्ता नव्हे तर समाज परिवर्तन, संघर्षातून विधायक परिवर्तन आणि विचारांच्या बळावर नवी पिढी घडवण्याचा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. व्यक्ती निघून जाते, पण तिचे विचार कायम जिवंत राहतात. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पेरलेले सामाजिक परिवर्तनाचे विचार आणि न्याय, समता व लोकशाहीसाठीचा त्यांचा संघर्ष पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गांधी स्मारक निधीचे विश्वस्त म्हणून त्यांनी गांधी विचारांचा प्रसार केला. डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सप्तर्षी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.