वातावरणात होतोय कमालीचा बदल; ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट, वादळी पावसाचीही शक्यता
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण आठवडाभरात 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. शनिवारीही शुक्रवारच्या तुलनेत तापमानात घट नोंदवण्यात आली. सायंकाळी काही भागात पावसाचे थेंब पडल्याने नागपूरकरांना किंचित दिलासा मिळाला. येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत हवामान विभागाने वादळासह पावसाचीही शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील आठवडाही तापमानावर नियंत्रण राहण्याची शक्यता असून, नागपूरकरांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्ह व सावलीचा खेळ सुरू आहे. दुपारी उन्ह तर सायंकाळी ढगाळ वातावरण किंवा पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटापासून दिलासा मिळाला आहे. परंतु, आर्द्रतेमुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहे. या आठवड्यात शुक्रवारी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. शनिवारी यात एका अंशाने घट झाली असून, 39.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. परंतु, किमान तापमानात शनिवारी 2.2 अंशाने वाढ झाली.
दरम्यान, शनिवारी किमान तापमान 26.6 अंश सेल्सिअस होते. शुक्रवारचा दिवस वगळता या आठवड्यातील पाच दिवस तापमान 40 अंशाखाली होते. त्यामुळे दिवस नागपूरकरांना चटके जाणवले नाही.
राज्यातील वातावरणात होतोय बदल
गेले काही दिवस राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी कडक उन्हाळा तर काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस कोसळत आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या वेळेस अवकाळी पावसाने पुणे शहराला देखील झोडपून काढले आहे. पुण्यातील पेठ भाग आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक पाऊस सुरू झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली.
विदर्भात गारपीट होण्याचा इशारा
राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशीव, नांदेड, सोलापूर भागात पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील दोन दिवस गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत देखील पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.