चिपळूण-तिवरे एसटीत मद्यधुंद प्रवाशाचा राडा (संग्रहित फोटो)
चिपळूण : चिपळूण-तिवरे या एसटी बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने बस चालक आणि वाहकासोबत हुज्जत घालत त्यांना मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना कळकवणे फाट्याजवळ घडली आहे. या प्रवाशाने केवळ शिवीगाळच केली नाही, तर चालकाच्या शर्टाचा खिसा फाडून त्याला जखमी केले. झटापटीत वाहकाचे पैसेही गहाळ झाले आहेत. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात संबंधित प्रवाशाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 मार्च रोजी सायंकाळी चारच्या सुमारास एसटी बस (एमएच २० बीएल २४३७) तिवरे गावाकडे जात असताना हा प्रकार घडला. बसमधील प्रवासी प्रकाश बाबा कोकरे (वय ३१, रा. नांदिवसे) हा दारूच्या नशेत प्रवास करत होता. त्याचे तिकीट कळकवणे फाट्यापर्यंतच असल्याने वाहक पाराजी सरवदे यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. याचा राग येऊन प्रकाश कोकरे याने वाहक आणि चालक उमेश सुखदेव हजारे (वय ३६) यांच्याशी विनाकारण वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
हेदेखील वाचा : Ashok Kharat Case update: ‘म्हणून जास्त उडायचं नसतं!…; रोहिणी खडसेंनी चाकणकरांच्या जखमेवर मीठ चोळलं
दरम्यान, प्रकाश कोकरे याने चालकाला हाताने मारहाण केली. यात चालकाच्या चेहऱ्यावर नखे लागून दुखापत झाली. या झटापटीत चालकाच्या शर्टाचा खिसा फाटला. वाहकासोबत झालेल्या धक्काबुक्कीत त्यांच्या खिशातील ८०० रुपये गहाळ झाले आहेत. शासकीय कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी चालक उमेश हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकाश कोकरे विरुद्ध गुन्हा दाखल केला.
डिझेल खरेदीतून दरवर्षी सुमारे 241 कोटी रुपयांची बचत
दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया कोणताही हस्तक्षेप सहन न करता पारदर्शक पद्धतीने राबविल्यामुळे केवळ डिझेल खरेदीतून दरवर्षी सुमारे 241 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.






