नाशिक : निर्यात शुल्क लागू केल्याने काही काळ नियंत्रणात राहिलेल्या कांदा दराने (Onion Rate) आवक घटल्यामुळे नव्याने उसळी घेतली आहे. बुधवारी एकाच दिवसांत उन्हाळ कांद्याचे दर प्रति क्विंटलला 500 ते 600 रुपयांनी वधारले. देशांतर्गत मागणी कायम असताना आवक कमी होत आहे. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याने हंगामातील सर्वोच्च पातळी गाठली.
लासलगाव बाजार समितीत मंगळवारी उन्हाळ कांद्याला क्विंटलला सरासरी 3800 रुपये, बुधवारी ते 4351 भाव मिळाला होता. मनमाड बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या भावाने उसळी घेतली. इतर बाजार समित्यांमध्येही असेच चित्र होते. राजधानी दिल्लीच्या किरकोळ बाजारात कांदा 50 ते 60 रुपये किलोने मिळतो. तर आठवडाभरापूर्वी कांदा 30 ते 40 रुपये किलोने मिळत होता. आठवडाभरात कांदा 50 टक्क्यांनी महागला आहे. आणि डिसेंबरमध्ये नवीन पीक येण्यापूर्वी महागड्या कांद्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही.
शेतकऱ्यांना फायदा नाहीच
कांदा दराचा आलेख वाढत असताना निर्यात मात्र अगदी नगण्य सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही व्यापारी कांदा खरेदी बाब धास्तावलेले आहे. केंद्र सरकारकडून केव्हाही कांद्याबाबत कठोर पावले उचलली जाऊ शकतात, या कारणामुळे निर्यात मंदावलेली असल्याचे व्यापारी वर्गाकडून बोलले जात आहे.
कांद्याला चांगला भाव
लासलगाव बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे. मात्र, खराब हवामानामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याच्या प्रतवारी आणि गुणवत्तेत घट झाल्याने कुठेतरी पडतल बसत आहे. त्यामुळे केंद्राने कांदा भाव पाडण्यासाठी हस्तक्षेप करू नये, अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.