बेटिंग ॲप कंपनीवर ईडीची मोठी कारवाई (Photo Credit- X)
FairPlay Betting App Company: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) मुंबई युनिटने ‘फेअरप्ले’ (Fairplay) बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंग (PMLA) कायद्यांतर्गत ईडीने कंपनीची सुमारे ३०७.१६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेली ही सर्व मालमत्ता दुबईमध्ये असून, यामध्ये बँक खात्यातील रक्कम, तसेच फ्लॅट्स, विला आणि जमिनींचा समावेश आहे.
फेअरप्लेवर बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी आणि त्याचे अनधिकृत प्रक्षेपण केल्याचा आरोप आहे. एका मीडिया कंपनीने मुंबई सायबर पोलिसांत एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. कंपनीमुळे आपले १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर देशभरात फेअरप्लेविरोधात आणखी काही एफआयआर दाखल झाले, आणि प्रकरणाची चौकशी ईडीकडे सोपवण्यात आली.
ED, Mumbai has provisionally attached movable/ immovable assets worth Rs.307.16 Crore (approx.) in the form of bank balances and lands/villas, flats located at Dubai (UAE), on 19/9/2025 under PMLA, 2002 as part of the ongoing probe in the case of “Fairplay” which is involved in… — ED (@dir_ed) September 22, 2025
ईडीच्या तपासात समोर आले आहे की, कृष लक्ष्मीचंद शाह हा फेअरप्ले बेटिंग ॲपचा मुख्य सूत्रधार आहे, जो दुबईतून आपले संपूर्ण नेटवर्क चालवत होता. त्याने दुबई, कुराकाओ आणि माल्टामध्ये अनेक कंपन्यांची नोंदणी केली होती, ज्यांच्या माध्यमातून बेटिंग ॲपचा कारभार चालत होता. गुन्ह्यातून कमावलेल्या पैशातून शाह आणि त्याच्या कुटुंबियांनी दुबईमध्ये अनेक महागड्या मालमत्ता खरेदी केल्या. तपासात शेकडो कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग आणि बनावट ट्रेडिंगद्वारे परदेशात पैसे पाठवल्याचेही उघड झाले आहे.
Suresh Raina: बेटिंग App प्रकरणात सुरेश रैनावर कोणते आरोप? ED च्या फेऱ्यात अडकला, चौकशीसाठी बोलावले
या प्रकरणात ईडीने यापूर्वीही अनेक ठिकाणी छापेमारी करत रोकड आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती. नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान अनेक मालमत्तांवर टाच आणण्यात आली होती, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये चिंतन शाह आणि चिराग शाह या दोन आरोपींना अटकही करण्यात आली होती.
या प्रकरणी ईडीने एप्रिल २०२५ मध्ये मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. आतापर्यंत ईडीने एकूण ६५१ कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तपास अजूनही सुरू असून, येत्या काळात ईडी या कंपनीच्या आणखी मालमत्ता जप्त करण्याची शक्यता आहे.