DCM Eknath shinde press live on maratha reservation manoj jarange patil andolan
मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी खड्डा खणल्यास बृहन्मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या १५ हजार रुपये दंडाच्या निर्णयाचा अखेर पुनर्विचार होणार आहे. या मागणीसंदर्भात कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आज (31 जुलै) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे पूर्वीप्रमाणे केवळ २ हजार रुपये शुल्कच आकारले जाणार असून, हजारो गणेश मंडळांना याचा थेट लाभ होणार आहे.
गणेश उत्सव मंडळांसाठी हा दिलासादायक निर्णय असून, त्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भूमिका निर्णायक ठरली. ३० जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालयात आयोजित ‘राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर’ प्रसंगी विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंडळांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर मंत्री लोढा यांनी दंडाच्या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.
“गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि तो प्रत्येकाला जल्लोषात साजरा करता यावा यासाठी सरकार तत्पर आहे. लवकरच आयुक्तांची भेट घेऊन यावर तोडगा काढू” असे आश्वासन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिबिरात दिले होते. सदर आश्वासन महायुती सरकारद्वारे आज पूर्ण करण्यात आले असून, यामुळे मुंबईतील हजारो सार्वजनिक गणेश मंडळांना लाभ होणार आहे.
दरम्यान नागरिकांच्या विविध तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनता दरबार आयोजित करत आहोत. मुंबईमध्ये आयोजित केलेला हा पाचवा जनता दरबार होता आणि त्याला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे, असे यावेळी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
नव्या नियमावलीनुसार गणेश उत्सव मंडळांनी मंडपासाठी खड्डा खणल्यास, मुंबई महापालिकेने १५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत असलेल्या नाराजीची मंत्री लोढा यांनी जनता दरबारात दखल घेतली. “गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा सण आहे. सर्वांनाच हा सण जल्लोषात साजरा करता यावा यासाठी आम्ही तत्पर आहोत. मुंबई महापालिकेद्वारे लावण्यात आलेल्या दंडाबाबत गणेश मंडळांच्या असलेल्या भावना आम्ही जाणतो. त्याबाबत लवकर आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू.”, असे त्यांनी सांगितले.