माणिकराव कोकाटेंना कोणते खाते मिळणार (फोटो- ani)
मुंबई: राज्याचे विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विधानभवनात ऑनलाईन रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी नाही तर सरकार भिकारी आहे असे वादग्रस्त विधान केले. त्यावर मुख्यमंत्रीआणि उपमुख्यमंत्र्यानी नाराजी व्यक्त केली. मात्र आता माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यांना कदाचित क्रीडा खाते मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडल्याचे म्हटले जात आहे. विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता त्यांचा राजीनामा न घेता त्यांचे खाते बदलले जाऊ शकते अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्याकडे असलेले कृषी खाते काढून घेऊन ते दत्तात्रय भरणे यांना दिले जाऊ शकते. तसेच भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा खाते कोकाटे यांना दिले जाण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यावर कोकाटे चांगलेच वादात सापडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते. तसेच त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्र्यांचा क्लास घेत चांगलीच तंबी दिल्याचे देखील म्हटले जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या मागणीनंतर व समोर आलेला व्हिडीओ, वादग्रस्त विधाने अशा सर्व गोष्टीनंतर देखील माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा न घेतल्यास खात्यात फेरबदल केले जाऊ शकतात. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे क्रीडा खाते माणिकराव कोकाटेंना आणि कोकाटे यांचे कृषी खाते भरणे यांना दिले जाऊ शकते. त्यामुळे फक्त खातेबदल करून ऑनलाइन रमी व्हिडीओ प्रकरणावर राज्य सरकार पांघरूण घालत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी भेट घेतली. जे काही घडले ते चुकीचे घडले. महाराष्ट्राच्या राजकारणात झाले नाही पाहिजे, असे अजित पवार म्हणाले असल्याचे घाडगे म्हणाले. दरम्यान अजित पवार यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हाकलून द्यावे अशी मागणी छावा संघटनेने केली आहे.
विजय घाडगेंचा अजित पवारांना थेट इशारा
माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हाकलून द्यावे. त्यांचा राजीनामा न घेतल्यास आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. आम्ही अजित पवारांनी दोन दिवसांची वेळ मागितली आहे. आम्हाला का मारहाण केली? आमचे काय चुकले? असा प्रश्न अजित पवारांना आम्ही विचारले. त्यावर घडलेला प्रकार चुकीचा असून, त्या व्यक्तीला पुन्हा पक्षात घेणार नाही असे पवारांनी सांगितले असल्याचे विजय घाडगे म्हणाले.