अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आवाहन (फोटो सौजन्य-X)
मुंबई : विभागाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना मोटार वाहन निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीने अधिकारांबरोबरच जबाबदारीमध्ये वाढ झाली आहे. पदोन्नत अधिकाऱ्यांनी राज्यात रस्ता सुरक्षा वाढवून अपघाती मृत्यू रोखण्यावर भर देण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
मोटार वाहन निरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर नव्या पदाचे चिन्ह लावून पदभार स्वीकारण्याचा समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना परिवहन मंत्री सरनाईक बोलत होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एस. टी. महामंडळाच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांची सेवा करण्यात येते. राज्यात पाचव्या क्रमांकावर महसूल मिळवून देणारा हा विभाग असून विभागामध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यात येत आहेत. पदोन्नत झालेल्या ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकच्या रिक्त जागांवर नवीन उच्च शिक्षित उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे विभागात आणखी उच्च शिक्षित व तंत्रज्ञानस्नेही मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी गतिरोधक मुक्त यंत्रणा विकसित करावी. तसेच एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याबरोबरच अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच रस्त्यांवर दिशादर्शक फलकांची संख्या वाढविण्यात यावी. अपघात होऊच नये अशी व्यवस्था निर्माण करावी. पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांनी विभागाची प्रतिमा नेहमी उज्ज्वल ठेवण्याची दक्षता बाळगावी असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार म्हणाले, पदोन्नतीने जबाबदारीत वाढ झाली आहे. वाहनांची संख्या, तंत्रज्ञान वाढत आहे. मोटार वाहन निरीक्षक हे विभागाची ओळख आहे. त्यामुळे आपली जबाबदारी जास्त आहे. परिवहन विभागाच्या सेवांची तुलना अन्य प्रगत देशाशी होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर असलेल्या सेवांची नागरिकांची अपेक्षा आहे. नागरिकांच्या उंचावलेल्या अपेक्षापूर्तीसह अपघातांची संख्या रोखण्याचे आव्हान विभागासमोर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अपघातांची संख्या रोखण्यावर भर देण्यात येत आहे. भारतातील सर्वात मोठी आयटीएमएस (इंटरनेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणाली उभारत आहेत. अपघाती मृत्यू मागील दोन वर्षापासून कमी होत आहे. रस्ता सुरक्षा ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.
प्रास्ताविक अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी केले. कार्यक्रमादरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात ८ अधिकाऱ्यांना पद अलंकरण करण्यात आले. यावेळी पदोन्नत अधिकाऱ्यांना कर्तृत्वाची शपथ देण्यात आली. पदोन्नत अधिकाऱ्यांच्यावतीने मोटार वाहन निरीक्षक प्रवीण हरदे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी तर आभार विजय इंगोले यांनी मानले.