पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील एका कर्मचारी गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून तीन हजार रुपये घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांकडे लाच मागितल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित करण्याचीही मागणी संघटनेने विद्यापीठ प्रशासनाकडे केली.
बीएचे शिक्षण घेणाऱ्या प्रथम भंडारी या विद्यार्थ्याला गुणपत्रिका देण्यासाठी एका कर्मचाऱ्याने तीन हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम घेतल्यानंतर विद्यार्थ्याने पैसे दिल्यानंतरच त्याला गुणपत्रिका देण्यात आली. कर्मचाऱ्याला जाब विचारून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकत्यांनी कुलगुरू कार्यालयाकडे मागणी केली आहे. सबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला आहे. दरम्यान, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी या प्रकरणात लक्ष घालून, आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
[blockquote content=”आमच्याकडील नोटांचे आणि संबंधित कर्मचाऱ्याकडून जप्त केलेल्या नोटांचे क्रमांक जुळले आहेत. याबाबत विद्यापीठाने सबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करावी. ” pic=”” name=”-महादेव रंगा, अभाविप”]