वसई : तरुणाचा कनिष्ठ अभियंता राजेश रविशंकर गुप्ता याला दोन हजाराची लाच घेताना ठाण्याच्या लाचलुचपत विभागाने रंगे हात अटक केली आहे. फिर्यादीच्या दुकानाला विजेचे दोन मिटर लावून विजपुरवठा देण्याकरीता राजेश गुप्ताने दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे फिर्यादीने याबाबत ठाणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीची शहानिशा केल्यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचून, सोमवारी दुपारी तीन वाजता दोन हजार रुपये घेताना गुप्ताला रंगेहाथ पकडले. मंगळवारी रात्री अडीज वाजता त्याच्यावर नायगांव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी, राजेश गुप्ता याला अटक करण्यात आली आली आहे. या कनिष्ठ अभियंत्याला याअगोदरही लाच घेताना अटक करण्यात आली होती. आता ही त्याची दुसरी वेळ आहे.